चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी विमा द्यावा लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:34 PM2018-09-18T23:34:26+5:302018-09-18T23:57:59+5:30
विम्याच्या कालावधीमध्ये चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी, वाहन मालकाला विम्याची रक्कम द्यावी लागेल असा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या वाहन मालकाला विम्याचे २१ लाख रुपये व त्या रकमेवर व्याज देण्यात यावे असे आदेश इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. एवढेच नाही तर, वाहन मालकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विम्याच्या कालावधीमध्ये चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी, वाहन मालकाला विम्याची रक्कम द्यावी लागेल असा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या वाहन मालकाला विम्याचे २१ लाख रुपये व त्या रकमेवर व्याज देण्यात यावे असे आदेश इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. एवढेच नाही तर, वाहन मालकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
राधेशाम इंगोले असे वाहन मालकाचे नाव असून ते नरेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी मॅगमा एचडीआय रेनेरल इन्शुरन्स कंपनीकडून ट्रकचा २१ लाख रुपयांचा विमा काढला होता. २१ फेब्रुवारी २०१४ ते २० फेब्रुवारी २०१५ पर्यंत विम्याचा कालावधी होता. मार्च-२०१४ मध्ये ट्रकच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपली. त्यामुळे त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, १२ मे २०१४ रोजी रात्री त्यांचा ट्रक चोरीला गेला. त्यानंतर त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात ट्रक चोरीची तक्रार नोंदवली. तसेच, १६ जुलै रोजी विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला. परंतु, कंपनीने ट्रकच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपल्यामुळे आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रतिपूर्ती झाली नसल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. परिणामी, इंगोले यांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने विविध बाबी लक्षात घेता त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला. इंगोले यांच्या वतीने अॅड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.