घर बंद असेल तरी येणार ११६ रुपये वीज बिल; दुकानाकरिता लागणार ४७० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 08:00 AM2023-04-04T08:00:00+5:302023-04-04T08:00:06+5:30
Nagpur News जर तुम्ही घराला कुलूप लावून महिनाभरासाठी बाहेर गेलात. एक युनिटही वीज वापरली नाही. तरी महावितरणकडून आपल्याला कमीत कमी ११६ रुपयांचे वीज बिल येईल.
कमल शर्मा
नागपूर : जर तुम्ही घराला कुलूप लावून महिनाभरासाठी बाहेर गेलात. एक युनिटही वीज वापरली नाही. तरी महावितरणकडून आपल्याला कमीत कमी ११६ रुपयांचे वीज बिल येईल. जर दुकान किंवा कुठलेही व्यावसायिक प्रतिष्ठान असेल तरी विजेचा कुठलाही वापर केला नाही तरी ४७० रुपये द्यावे लागतील. एप्रिलमध्ये हा खर्च वाढून १२८ रुपये आणि ५१७ रुपये होईल. ही कमीत कमी रक्कम आहे. यानंतरही महावितरण इलेक्ट्रिसिटी ड्युटी वसूल करेल.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणची दरवाढीची याचिका मंजूर करीत नागरिकांना मोठा शॉक दिला आहे. आयोगाचा असा दावा आहे की, २०२३-२४ मध्ये २.९ टक्के आणि २०२४-२५ मध्ये ५.६ टक्के वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. परंतु याचिका मंजुरीनंतर खऱ्या अर्थाने ३४ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ झाली आहे. इंधन समायोजन शुल्क वीज दरात समाविष्ट करून आकड्यांचा खेळ करीत दरवाढ अधिक नसल्याचा दावा केला जात आहे. फिक्स चार्ज वाढल्यानेही ही दरवाढ अधिक झाली आहे. फिक्स चार्ज हे असे शुल्क आहे जे ग्राहकांना द्यावेच लागते. त्यांनी विजेचा वापर केला असेल किंवा केला नसले तरी हे चार्ज त्यांच्याकडून वसूल केले जाते.
घरगुती वीज ग्राहकांचा विचार केला तर त्यांना यासाठी १०५ रुपये द्यावे लागत होते. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत ११६ व १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत १२८ रुपये द्यावे लागतील. ऊर्जा तज्ज्ञ महेंद्र जिचकार यांनी सांगितले की, विजेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांकडून कुठलेही शुल्क घ्यायला नको.
महावितरणने आपल्या याचिकेत ६७,६४३ कोटी रुपयांच्या महसुलाच्या भरपाई वीज बिलाच्या माध्यमातून करण्याची विनंती केली होती. परंतु आयोगाने ३९,५६७ कोटी रुपयेच मंजूर केले. पॉवर परचेजसाठी महावितरणने ४,१३,८१२ कोटी रुपयांची मागणी केली होती. आयोगाने ४,०२,९९० कोटी रुपये मंजूर केले. त्याचप्रकारे परिचालन खर्चामध्येही ७०१ कोटी रुपयांची कपात केली. महावितरणने यासाठी ४८,१३४ कोटी रुपयांची मागणी केली होती. आयोगाने ४७,४३३ कोटी रुपये मंजूर केले.
कसे वाढले शुल्क
श्रेणी - मार्च २०२३ पर्यंत- एप्रिल २०२३- एप्रिल २०२४
घरगुती - १०५ रुपये - ११६ रुपये - १२८ रुपये
वाणिज्यिक - ४२७ रुपये - ४७० रुपये - ५१७ रुपये
कृषी - ४३ वरून ३८७ रुपये, ४७ वरून ५०६ रुपयांवर
-----------------------------------------