नेते पळाले तरी शिवसैनिक लढा देतील; उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पैदल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 09:22 PM2022-06-29T21:22:42+5:302022-06-29T21:23:06+5:30
Nagpur News एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांला शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांची साथ मिळाली असली तरी नागपुरातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी रस्त्यावर उतरले.
नागपूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांला शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांची साथ मिळाली असली तरी नागपुरातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी रस्त्यावर उतरले. झांशी राणी चौकातून पायदळ मार्च काढत आपण मुख्यमंत्र्यांसोबत खंबीरपणे असल्याचा संदेश शिवसैनिकांनी दिला. यानंतर व्हेरायटी चौकात पोहचून शिवसैनिकांनी निदर्शने केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, सुरेश साखरे, महिला जिल्हा संघटिका सुरेखा खोबरागडे, सुशीला नायक, नगरसेविका मंगला गवरे आदींच्या नेतृत्वात पदाधिकारी व शिवसैनिक झांशी राणी चौकात जमले. येथून पायदळ मार्चमध्ये सहभागी झाले. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ आदी नेत्यांनी शिवसेना सोडली. मात्र, त्यानंतरही शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना ताकदीने उभी राहिली. शिवसेनेने ऑटोचालक, पानठेलावाला अशा सामान्य माणसांना मोठे केले आहे. त्यामुळे कितीही आमदार सोडून गेले तरी शिवसेना संपणार नाही, असा दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
आंदोलनात राम झोडे, विशाल कोरके, अंगद हिरोंदे, मुकेश रेवतकर, शैलेश अंबिलाकर, गौरव तिजारे, विजय शाहू, धीरज फंदी, अक्षय मेश्राम, प्रीतम कापसे आदींचा सहभाग होता.
उदयपूर हत्याकांडाचा निषेध
- राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली. याचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.