तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 06:12 PM2022-08-13T18:12:53+5:302022-08-13T18:13:24+5:30
Nagpur News आगामी काळात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल एवढी मोठी शक्ती उभारू, असा विश्वास भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला.
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्षपद हे जेवढे मोठे आहे, तेवढेच जबाबदारीचे आहे. पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागेल, अशी कुठलीही कृती मी करणार नाही. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देत आगामी काळात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल एवढी मोठी शक्ती उभारू, असा विश्वास भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला.
भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपतर्फे चंद्रशेखर बावनकुळे यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थित होेते. सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, गडकरी, फडणवीस या दोन मोठ्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यांची यशस्वी गाथा सोबत घेऊन मला काम करायचे आहे. येत्या काळात प्रत्येक बूथवर ३० नेते तयार करायचे आहेत. तसेच प्रत्येक बूथवर १८ ते २३ वयोगटातील युवकांमधून ५० ‘युवा वॉरियर’ नेमायचे आहेत. येत्या काळात सत्तेने घेतलेला निर्णय दुसऱ्याच दिवशी संघटनेमार्फत जनतेपर्यंत पोहोचेल, अशी यंत्रणा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षपद सोपवून बावनकुळेंचा मोठा सन्मान : फडणवीस
गेल्या निवडणुकीत बावनकुळे यांना थांबावे लागले. त्यावेळी लोक बावनकुळे यांचे राजकारण संपले असे सांगत होते; पण भाजपची ध्येय, धोरणे, नीती आपल्याला ठावुक आहे. बावनकुळे यांनी लगेच निर्णय स्वीकारला. त्यांच्या पक्षनिष्ठेला तोड नाही. ३२ मतदारसंघांचे दौरे करून प्रचार केला. मी त्याच दिवशी बोललो होतो, जनतेच्या मनातील नेता असलेल्या या कार्यकर्त्याला एक दिवस याहीपेक्षा मोठेपद मिळेल. आज तो क्षण आपण अनुभवत आहोत. अध्यक्षपद ही भाजपमधील मोठी जबाबदारी आहे. ती एका कार्यकर्त्यावर सोपविली जाणे हा खूप मोठा सन्मान आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांचा गौरव केला.
सरकार नसतानाही आपल्या मतदारसंघात निधी कसा आणायचा हे बावनकुळे यांच्याकडून शिकावे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री वित्त मंत्र्यांवर या मुद्द्यावर नाराज झाले होते, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली. मी सत्तेचा वापर करून महाराष्ट्राची विकासाची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही संघटना मजबूत करा. आम्ही ठामपणे तुमच्या सोबत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.