व्हीव्हीआयपी असाल तरीही मुद्रांक खरेदीसाठी तुम्हालाच जावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 09:13 PM2023-04-05T21:13:59+5:302023-04-05T21:14:38+5:30
Nagpur News राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एक एप्रिलपासून हस्ते (मार्फत) पद्धत बंद केली आहे. त्यामुळे मुद्रांक खरेदी करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावे मुद्रांक हवे आहे, त्याच व्यक्तीला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे
नागपूर : राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एक एप्रिलपासून हस्ते (मार्फत) पद्धत बंद केली आहे. त्यामुळे मुद्रांक खरेदी करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावे मुद्रांक हवे आहे, त्याच व्यक्तीला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. परिणामी, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हणत शासनाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असला तरी याला मुद्रांक विक्रेत्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय सध्या तरी मुंबई सोडून इतर ठिकाणी विक्रेत्यांनी लागू केलेला नाही. नागपूरचाच विचार केला तर नागपुरात जुन्या पद्धतीनुसारही मुद्रांक विक्री सुरू आहे.
एक एप्रिलपासून हस्ते पद्धत बंद
पूर्वी कुणालाही मुद्रांक खरेदी करायचा असेल तर कुणाच्याही नावाचा मुद्रांक कुणालाही सहज मिळत असे. ते देताना हस्ते किंवा मार्फत असे लिहून संबंधिताची स्वाक्षरी घेतली जात असे; परंतु आता ही हस्ते (मार्फत) पद्धत बंद केली आहे.
मात्र, याला मुद्रांक विक्रेत्यांचा विरोध असून नागपुरात तरी जुन्या पद्धतीनेच मुद्रांक विकले जात आहेत.
स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी करावी लागणार
मुद्रांक खरेदी करताना ज्याला मुद्रांकाची गरज आहे. त्या व्यक्तीला मुद्रांक विक्रेत्याकडे स्वत: जाऊन आधार कार्ड देऊन सही करावी लागणार आहे.
महिला, ज्येष्ठांना कसरत
शासकीय कामासाठी, खरेदी- विक्रीसाठी शपथपत्र लिहिण्यासाठी मुद्रांकाची गरज भासते. त्यामुळे ती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असते.
शासनाच्या या निर्णयामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, अपंगासह इतरांनाही मोठा फटका बसणार आहे.
- ज्येष्ठ नागरिक काय म्हणतात...
मुद्रांक खरेदी कुणीही केला तरी प्रत्यक्षात शपथपत्र सादर करताना सेतूमध्ये त्याचा लाइव्ह फोटो काढतात. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमीच असते. अशा परिस्थितीत या नवीन निर्णयाने महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना मात्र विनाकारण त्रास व अडचणींचा सामना करावा लागेल.
चंपकलाल गौर
- मुद्रांक विक्रेते काय म्हणतात...
हा निर्णय अतिशय विसंगत असून सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक आहे. विशेषत: महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना अडचणीचा आहे. उद्या मुख्यमंत्र्यांना मुद्रांक घ्यायचा असेल तर त्यांना स्वत: यावे लागणार का? याला आमचा विरोध आहे. याबाबत प्रशासनासोबत बोलणी सुरू आहे. सध्या आम्ही जुन्या पद्धतीनेच मुद्रांक विकत आहोत.
सतीश पाटील, विदर्भ मुद्रांक विक्रेता