एप्रिलमध्येही तापमानाचा दिलासा नाहीच; पारा सामान्यापेक्षा अधिकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 08:29 PM2022-03-31T20:29:37+5:302022-03-31T20:30:07+5:30
Nagpur News एप्रिल महिनाही चांगलाच तापदायक ठरण्याचा अंदाज आहे आणि सर्वाधिक ताप विदर्भालाच हाेणार आहे.
नागपूर : मार्च महिन्यात तापमानामुळे हाेरपळणाऱ्या नागरिकांना एप्रिल महिन्यातही उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. देशात उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतासह थंड राहणाऱ्या पूर्वाेत्तर राज्यातही या महिन्यात तापमान सामान्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. ला नीनामुळे समुद्राकाठच्या प्रदेशात पाऊस हाेईल, पण उत्तर भारत व महाराष्ट्रातही पावसाची शक्यता नगण्यच आहे.
भारतीय हवामान खात्याने १९६१ ते २०१० पर्यंतच्या पूर्वइतिहासाच्या आधारावर एप्रिल महिन्यातील हवामानाच्या स्थितीचा अंदाज वर्तविला आहे. या सीझनमध्ये मार्च महिन्यात तापमानाने उसळी घेतली आहे. आता एप्रिल महिनाही चांगलाच तापदायक ठरण्याचा अंदाज आहे आणि सर्वाधिक ताप विदर्भालाच हाेणार आहे. साधारणत: एप्रिल महिन्यात विदर्भाचे तापमान ४२, ४३ अंशावर पाेहचते. मात्र यावेळी सरासरीपेक्षा २ ते ३ अंश अधिक राहण्याचा अंदाज असून, ते ४५ पार जाण्याची शक्यता आहे. या महिन्यात दाेन ते तीनवेळा उष्ण लहरींचा प्रकाेप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. महिन्याची सुरुवातही उष्ण लहरींनी हाेत आहे. विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच मुंबई, काेकण, गाेवा या भागातही संपूर्ण महिन्यात तापमानाचा प्रकाेप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
ला नीनाच्या प्रभावाने पाऊस
प्रशांत महासागरात ला नीना वादळ तयार हाेण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा प्रभाव हिंदी महासागरापर्यंत पाेहोचताे. त्याच्या प्रभावाने मुंबई, काेकण, गाेवा तसेच दक्षिण भारतात समुद्र काठावरील राज्यात एप्रिलमध्ये पाऊस हाेण्याची शक्यता आहे. उत्तर, पश्चिम, मध्य भारतासह पूर्वाेत्तर राज्यात यावेळी एप्रिलमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस हाेईल. सरासरी ३९.९ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता नगण्यच आहे.
पुढचे तीन दिवस उष्ण लहरी
दरम्यान विदर्भ, मराठवाड्यात २८ मार्चपासून सुरू झालेले उष्ण लहरीचे सत्र ३ एप्रिलपर्यंत कायम राहील. तापमान १ ते २ अंशाने वाढेल. त्यानंतर तापमानापासून थाेडा दिलासा मिळेल.
जगातील उष्ण शहरात चंद्रपूर, वर्धा, अकाेला
दरम्यान, विदर्भातील तापमान तिसऱ्या दिवशीही उच्चांकीवर कायम हाेते. ३१ मार्चला झालेल्या नाेंदीनुसार, जगभरातील सर्वाधिक उष्ण असलेल्या पहिल्या १५ शहरांमध्ये चंद्रपूर, अकाेला व वर्धा शहराचा समावेश आहे. गुरुवारी चंद्रपूरला ४४ अंश, वर्धा ४३.२ अंश आणि अकाेल्याला ४३.१ अंश तापमानाची नाेंद झाली. पुढचे तीन दिवस हा पारा स्थिर राहणार आहे.