‘व्हिएतनाम’मध्येही 'बाबासाहेब'च ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 07:44 PM2022-10-01T19:44:11+5:302022-10-01T19:51:36+5:30
Nagpur News व्हिएतनाम या देशानेही येणाऱ्या पिढीने त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळत राहावी म्हणून ‘हो ची मिन्ह’ येथील जगप्रसिद्ध विद्यापीठाच्या परिसरात बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यात येणारा आहे.
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने, ज्ञानाने संपूर्ण जग प्रभावित आहे. म्हणूनच ‘सिम्बाॅल ऑफ नाॅलेज’ म्हणून बाबासाहेबांची ओळख असून जगभरातील विद्यार्थी त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळेच व्हिएतनाम या देशानेही येणाऱ्या पिढीने त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळत राहावी म्हणून ‘हो ची मिन्ह’ येथील जगप्रसिद्ध विद्यापीठाच्या परिसरात बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यात येणारा आहे.
‘हो ची मिन्ह’ हे व्हिएतनामच्या राजधानीचे शहर असून, उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याला ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असे नाव देण्यात आले आहे.
बौद्ध धम्म हा भारतातून जगभरात पसरला. परंतु या देशातच तो एकेकाळी नामशेष झाला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर रोजी नागपुरात लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर चंद्रपुरात लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देत बौद्ध धम्म पुन्हा एकदा पुनर्जीवित केला.
तथागत गौतम बुद्धांचा देश म्हणून बौद्ध जगतात भारताबद्दल विशेष प्रेम आहे. तसाच आदरभाव आता बाबासाहेबांबद्दलही निर्माण झाला आहे. त्यामुळेच जगभरातील बौद्ध विचारवंत व बांधव भारतात येतात तेव्हा ते दीक्षाभूमीसह बाबासाहेबांशी संबंधित स्थळांनाही भेटी देत असतात.
यातच व्हिएतनाम येथील बौद्ध विचारवंत भदंत थिच नाथ हन हे अनेकदा भारतात येऊन गेले. दोनदा ते नागपुरातही येऊन गेले. यादरम्यान त्यांना बाबासाहेबांचे विचार व कार्य अधिक समजून घेता आले. ते त्यांच्या कार्याने इतके प्रभावित झाले की, त्यांनी व्हिएतनाममध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध सिने अभिनेते गगन मलीक यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि सर्व गोष्टी जुळून आल्या.
- असा असेल पुतळा
बाबासाहेबांचा हा पुतळा १५ फूट उंच असून, तो धातूचा राहणार आहे. सध्या इंडोनेशियात हा पुतळा तयार होत आहे. जवळपास काम पूर्ण झाले असून येत्या १२ डिसेंबर २०२२ रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अजरामर असे आहे. बाबासाहेबांचा पुतळा हा मच्या देशातील (व्हिएतनाम) सध्याच्या व येणाऱ्या पिढीलाही प्रेरणा देत राहील.
-भदंत थिच नाथ हन.