तर नागपुरातही होऊ शकतो मुंबईसारखा अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:10 PM2017-12-29T23:10:41+5:302017-12-29T23:12:34+5:30

मुंबईतील कमला मिल परिसरात हॉटेल मोजोस बिस्ट्रो व वन-अबॉव्ह पब यामध्ये आग लागून १४ लोकांचा निष्पाप बळी गेला तर १६ लोक गंभीर जखमी झाले आहे. या घटनेला प्रशासन दुर्घटना समजून, थातूरमातूर कारवाई करून, त्यावर काही दिवसात पडदाही पाडेल. लोक विसरतीलही. परंतु अशी घटना नागपुरातही घडू शकते. कारण शहरातील ९० टक्क्याहून अधिक हॉटेलकडे अग्निशमन विभागाची परवानगीच नाही.

Even Nagpur can be taken place huge fire like Mumbai | तर नागपुरातही होऊ शकतो मुंबईसारखा अग्नितांडव

तर नागपुरातही होऊ शकतो मुंबईसारखा अग्नितांडव

Next
ठळक मुद्देहॉटेलनी टाळली अग्निशमनची परवानगी : घटनेनंतर अग्निशमन विभाग सतर्क

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मुंबईतील कमला मिल परिसरात हॉटेल मोजोस बिस्ट्रो व वन-अबॉव्ह पब यामध्ये आग लागून १४ लोकांचा निष्पाप बळी गेला तर १६ लोक गंभीर जखमी झाले आहे. या घटनेला प्रशासन दुर्घटना समजून, थातूरमातूर कारवाई करून, त्यावर काही दिवसात पडदाही पाडेल. लोक विसरतीलही. परंतु अशी घटना नागपुरातही घडू शकते. कारण शहरातील ९० टक्क्याहून अधिक हॉटेलकडे अग्निशमन विभागाची परवानगीच नाही.
पूर्वी रेस्टॉरंट, बार, हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागत होती. परंतु व्यावसायिकांच्या संघटनांनी पोलिसांच्या परवानगीला विरोध केला होता. सरकारवर दबाव आणून सरकारकडून ही परवानगी २०१५ मध्ये रद्द करून घेतली. ही परवानगी देताना पोलीस विभाग हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट यांना फायरची परवानगी मागत होते. त्यामुळे अग्निशमन विभाग ही परवानगी देताना व्यावसायिक प्रतिष्ठानाचे फायर आॅडिट करीत होते. आता या व्यवसायाला पोलिसांचीच परवानगी लागत नसल्याने, फायरचीही परवानगी व्यावसायिक घेत नाहीत. नागपूर अग्निशमन विभागाकडून २०१५ मध्ये ५७१ व्यावसायिकांनी फायरची परवानगी घेतली होती. त्यानंतर कुठल्याही हॉटेलने फायरची परवानगी मागितली नाही. नियमानुसार १५० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिकाने अग्निशमनची परवानगी घेणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे मुंबईत घडलेल्या घटनेमागे तेथील व्यापारीसुद्धा जबाबदार आहे. मुंबईत रुफ टॉप कल्चर वाढत आहे. त्यामुळे व्यापाºयांनी राजकीय दबाव आणून मुंबई महापालिकेकडून महिनाभरापूर्वी सोयीनुसार धोरण तयार करून घेतले. यासाठी आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. यात टेरेसवर होणाºया कार्यक्रमात नियमानुसार किचन असायला नको, कुठलेही डेकोरेशन नको. परंतु या हॉटेलच्या रुफ टॉपवर बांबूद्वारे ताडपत्रीचे आच्छादन केले होते. नागपुरात रुफ टॉप कल्चर नसले तरी, अनेक हॉटेल, बारमध्ये हा प्रकार आजही सुरू आहे. त्यामुळे नागपुरातही अशा घटनेची गंभीरता आणखी वाढली आहे.

अग्निशमन विभागाने मागितला अहवाल
बार, हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय या प्रतिष्ठानात विनापरवानगी तात्पुरते पेंडॉल उभारून एलपीजी सारखे ज्वलनशील पदार्थाचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. सोबतच विद्युत उपकरणाचाही वापर होतो. अशा प्रतिष्ठानाचे निरीक्षण करून, त्वरित अधिनियमांतर्गत कारवाई करण्यासाठी तसेच धोकादायक असलेले तात्पुरते बांधकाम त्वरित काढण्यासंदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सहा. विभागीय अधिकारी, स्थानक प्रमुख, व उपकेंद्र अग्निशमन अधिकाºयांना सूचना केल्या आहे. त्यासंदर्भातील अहवाल दोन दिवसात मागितला आहे.
 फायर आॅडिटच नाही
शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये अग्निशमनची परवानगी नाही, हे सत्य आहे. गेल्या दोन वर्षापासून व्यावसायिक अग्निशमनच्या परवानगीसाठी आलेच नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार जबाबदारी टाळण्याचा आहे. ज्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा उपयोग होतो त्याचे निरीक्षण करून, त्यांना सुरक्षा सेवा घेण्यासाठी बाध्य करणे हे प्रशासनाचे काम आहे. विशेष म्हणजे फायर सेफ्टी आॅडिट हे विभागाकडून करून न घेता तज्ञ संस्थेकडून करून घेणे गरजेचे आहे. परंतु फायर सेफ्टीकडे व्यावसायिक व प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने, मुंबईसारख्या घटना नागपुरातही घडू शकतात.
-प्रवीण सिंग, अग्निशमन तज्ञ

घरगुती कार्यक्रमाला थांबविणार कोण?
शहरात छोटे-मोठे घरगुती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घराच्या गच्चीवर साजरे करण्यात येतात. त्यासाठी गच्चीवर पेंडॉल टाकण्यात येतो. स्वयंपाकही बनविल्या जातो. प्रकाश व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. नियमानुसार ३० मीटरच्या वर लोक एकत्रित गोळा होत असेल तर, तिथे कुठल्याही ज्वलनशील वस्तूचा उपयोग करता येत नाही. परंतु शहरात धडाक्याने घरच्या गच्चीवर कार्यक्रम साजरे होताना दिसतात. विशेष म्हणजे कुठलीही अग्निशमन व्यवस्था नसताना. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये रुफ टेरेसवर होणारे कार्यक्रम कारवाईच्या माध्यमातून प्रशासन थांबवू शकते. परंतु घरगुती कार्यक्रमाला थांबविणार कोण, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Even Nagpur can be taken place huge fire like Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.