मातृ दुग्धपेढी असतानाही बालके दुधाला मुकलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:16+5:302021-09-07T04:11:16+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : आईचे दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे बाळांना स्तनपान देणे शक्य ...
सुमेध वाघमारे
नागपूर : आईचे दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे बाळांना स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांना डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयतील ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजेच ‘मातृदुग्ध पेढी’ मोठा आधार ठरण्याची शक्यता होती. परंतु, महिना होऊनही रुग्णालयात दुधाच्या कल्चर चाचण्याच होत नसल्याने इतर मातांची बालके दुधाला मुकलेली आहेत.
ज्या मातांमध्ये सुरुवातीच्या दिवसांत दूध येत नाही किंवा कुपोषित माता, क्षयरोगाची बाधा असलेल्या, कावीळ, एड्स किंवा इतर मानसिक आजारांची लागण असणाऱ्या आईला बाळाला दूध पाजता येत नाही. याशिवाय, आई रुग्णालयामध्ये भरती असल्यास, बाळाचा जन्म होताच आईचे निधन झाल्यास मातेच्या दुधाला मुकावे लागते. या जन्मदात्रीच्या दुधापासून वंचित राहणाऱ्या बाळांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ पर्याय आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात अनेक बालके मातेच्या दुधापासून वंचित राहिली. याची दखल घेत डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘मातृ दुग्ध पेढी’ उभारण्यात आली, ७ ऑगस्ट रोजी मोठा गाजावाजा करून उद्घाटन झाले. परंतु, महिना होऊनही आवश्यक सोयी उभ्या झाल्या नाहीत. या पेढीत रोज ८ ते १० बालकांसाठी दुधाची मागणी होत असल्याची माहिती आहे.
- दुधावर अशी होते प्रक्रिया
बाळंतपणानंतर निरोगी प्रकृती असणाऱ्या स्त्रीच्या दुधाची साठवण शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. ब्रेस्ट पंपाच्या मदतीने स्टिल कंटेनरमध्ये सर्वांत आधी साधारण पाच मिलिलिटर दूध काढून घेतले जाते. मग हे दूध प्रयोगशाळेत पाठविले जाते. प्रयोगशाळेतून दुधाची शुद्धता तपासल्यावर आईकडून जास्त दूध घेतले जाते. या दुधाचे ५६ ते ६३ अंश सेल्सिअस तापमानावर तीस मिनिटांसाठी पाश्चरायझेशन केले जाते. डागाचा मातृदुग्ध पेढीत इथपर्यंतच प्रक्रिया होते. दुधाचे कल्चर होत नसल्याने इतर बाळासाठी दूध पोषक आहे किंवा नाही त्याची माहिती मिळत नसल्याने तूर्तास तरी इतर मातांच्या बाळांना दूध देणे बंद आहे.
-‘एचएलएल’ प्रयोगशाळेकडून तपासणीच नाही
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयांपर्यंतच्या रुग्णांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक लॅब तपासण्यांच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, या हेतूने राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘एचएलएल’ कंपनीशी करार केला. त्यानुसार या कंपनीने मातेच्या दुधाचे कल्चर करणे अपेक्षित होते. परंतु, करारात याची नोंदच नसल्याने तपासणी बंद आहे.
-दुधाचे दानही कमी
डागा रुग्णालयात प्रसूत माता तीन किंवा पाच दिवसांपर्यंत राहतात. त्या हॉस्पिटलमध्ये असेपर्यंतच दुधाचे दान करतात. परंतु, अपेक्षेच्या तुलनेत त्यांच्याकडून फार कमी दान होत असल्याचे पुढे आले आहे. याची व्यापक जनजागृती होणे व आवश्यक सोयी उभ्या करणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-‘दुधाच्या कल्चर’साठी पत्र दिले
मातेच्या दुधाचे कल्चर होत नसल्याने दुसऱ्या मातेच्या बाळांना दूध देणे बंद आहे. ‘कल्चर’ करण्यासाठी ‘एचएलएल’ प्रयोगशाळेला पत्र दिले आहे. यामुळे लवकरच ते सुरू होण्याची शक्यता आहे.
-डॉ. माधुरी थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डागा