नागपुरात दुकाने बंद तरीही रस्त्यावर वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:28 PM2020-05-15T21:28:06+5:302020-05-15T21:32:20+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.
गुरुवारपासून शहरातील लॉकडाऊनला सौम्य करण्यात येऊन, दिशानिर्देशासह व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही बऱ्याच व्यापाऱ्यांच्या मनातील धास्ती अजूनही उतरलेली नसून अनेकांनी दुकाने बंद ठेवण्यातच धन्यता मानली आहे. एरवी व्यापारी प्रतिष्ठाने व ग्राहकांनी गजबजून असलेले महाल लॉकडाऊन शिथिलच्या दुसऱ्या दिवशीही शांतच होते. संपूर्ण व्यापारी पेठ दुसऱ्या दिवशीही बंदच होती. सक्करदरा, नंदनवन या भागातील दुकानेही उघडण्यात आली नव्हती. असे असताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहेत. शिथिलतेचा लाभ घेत टवाळखोर संधी साधत असल्याचे दिसून येते. विनाकाम बाहेर निघणारे हे टवाळखोर रस्त्यांवरील ट्राफिक कमी असल्याचा फायदा घेत बेफाम वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात एका बाईकवर एकच, अशी नियमावली असतानाही ट्रिपल सिट गाडी चालवून इतर वाहकांना संकटात टाकत असल्याचेही चित्र शुक्रवारी दुपारचे होते. संध्याकाळी तर पुन्हा या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत होते.
पावणे दोन महिन्यानंतर सिग्नल्स सुरू!
गेले दीड-पावणे दोन महिने टाळेबंदी असल्याने रस्त्यावरची गर्दी पूर्णपणे ओसरली होती. त्यामुळे, चौकांतील सिग्नल्स बंद झाली होती आणि ट्राफिक नियमावलीही सैल पडली होती. मात्र, शुक्रवारी रस्त्यावर वाढलेल्या चौतरफा गर्दीमुळे पुन्हा एकदा सिग्नल्स सुरू झाल्याची जाणिव होत होती. पोलीस यंत्रणा लॉकडाऊनमध्ये व्यस्त असल्याने या चौकांमध्ये पोलीस नव्हते तरीही नागरिक सिग्नल्स पाळत असल्याचे दिसून येत होते.