जुळी बाळे असतानाही त्या माउलीने केले दुधाचे दान, आयएएस महिला अधिकाऱ्याचा समाजापुढे आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 11:10 AM2023-01-29T11:10:59+5:302023-01-29T11:11:24+5:30
Mother: जन्मलेल्या बाळाच्या पोषणाबाबत दुधाची कमतरता भासू नये म्हणून काय करू अन् काय नको, अशी आईची अवस्था होते, परंतु एक माउली अशीही, जुळी अपत्ये जन्माला आल्यानंतरही तिने दुधाचे दान केले.
- सुमेध वाघमारे
नागपूर : जन्मलेल्या बाळाच्या पोषणाबाबत दुधाची कमतरता भासू नये म्हणून काय करू अन् काय नको, अशी आईची अवस्था होते, परंतु एक माउली अशीही, जुळी अपत्ये जन्माला आल्यानंतरही तिने दुधाचे दान केले. त्यांचे दूध आजारी व कमी वजनाच्या बालकांसाठी अमृत ठरले. विशेष म्हणजे, ही माउली आयएएस अधिकारी आहे.
मिताली सेठी असे त्या माउलीचे नाव. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व वनामतीच्या त्या संचालक आहेत. आईचे दूध हे अमृत मानले जाते. परंतु प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू, अनाथ बालके, कमी वजनाची किंवा विविध आजारामुळे स्तनपान शक्य नसल्याने नवजात बाळाला पावडरचे दूध देण्याची वेळ येते. याची दखल सेठी यांनी घेतली. जुळ्या बाळांना पाजूनही उरलेले दूध डागा रुग्णालयाच्या ‘मातृ दुग्ध पेढी’ला दान करीत सामाजापुढे एक आदर्श ठेवला.
‘आयएएस’ अधिकारी मिताली सेठी यांनी ‘मातृ दुग्ध पेढी’साठी घेतलेला पुढाकार इतर स्तनदा मातांसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे त्या या पेढीचा ‘ॲम्बॅसडर’सारख्याच आहेत. -डॉ. सीमा पारवेकर, अधीक्षक, डागा रुग्णालय
११०० एमएल दुधाचे केले दान
मिताली सेठी म्हणाल्या, चंद्रपूर व मेळघाटमध्ये असताना ‘ब्रेस्ट फिडिंग’वर काम केले. प्रसूतीनंतर बाळाला दूध पाजल्यानंतरही ‘ब्रेस्ट पंप’च्या साहाय्याने दूध काढता येते आणि योग्य प्रक्रियेद्वारे ते साठवताही येते याची माहिती होती. नोव्हेंबर महिन्यात जुळे बाळ जन्माला आली. त्यांना दूध पुरण्यासाठी रोज १०० एमएल दूध साठविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु गरजेपेक्षा अधिक दूध येत होते. यामुळे अतिरिक्त दूध दान करण्याची कल्पना आली. डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवे यांच्याशी संपर्क साधला. नंतर त्यांनीच पुढाकार घेऊन दुग्ध पेढीची भेट घडवून आणली. आणि ११०० मिलिलिटर दुधाचे दान केले