सुवर्णजयंती जवळ आली तरी नागपुरातील वाडी पोलिस ठाणे भाड्याच्या इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:15 AM2018-07-31T11:15:18+5:302018-07-31T11:19:22+5:30
उपराजधानी नागपूरपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडी पोलीस स्टेशनचा कारभार १९६९ पासून भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.
सुरेश फलके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानी नागपूरपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडी पोलीस स्टेशनचा कारभार १९६९ पासून भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्षही भाड्याच्या इमारतीत साजरे केले जाणार की पोलीस ठाण्याला स्वत:ची, हक्काची इमारत मिळणार असा प्रश्न वाडीतील नागरिकांमध्ये सध्या चर्चेत आहे.
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत वाडी पोलीस ठाण्याचा समावेश होतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडी, लाव्हा, सोनबानगर, वडधामना, सुराबर्डी, तकिया, द्रुगधामना, आठवा मैल, नागलवाडी, डिफेन्स, नाका क्र. १०, विद्यापीठ परिसरापर्यंतचा सात किमीचा परिसर येतो. या परिसराची लोकसंख्या ही एक लाखांपेक्षा अधिक आहे. या लोकसंख्येचा विचार करता पोलिसांची संख्या ही अपुरी पडते. तरीही कसातरी कारभार चालविला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात वाडी पोलीस ठाण्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हिंगणा एमआयडीसी, आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, ट्रान्सपोर्ट, गोदाम आदींमुळे या भागात नेहमी काहीतरी छोटे-मोठे गुन्हे घडत असतात. त्यातच अवैध दारूविक्री, जुगार, सट्टा, घरफोडी, टोळीयुद्ध, चेन
स्नॅचिंग, गँगवार आदी घटनांवर नियंत्रण मिळविण्यात वाडी पोलीस ठाणे काही प्रमाणात यशस्वीही झाले आहे. मात्र या पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत नसल्याने वेळोवेळी अनेक समस्या उद्भवतात. वाडी पोलीस स्टेशन हे १९६९ पासून भाड्याच्या इमारतीतच सुरू आहे. पुढील वर्षी ५० वर्षात पदार्पण करणारे हे पोलीस स्टेशन सुवर्ण महोत्सवही तेथेच साजरा करणार का, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेत आहे.
पोलीस वसाहतही नाही
वाडी पोलीस स्टेशनच भाड्याच्या इमारतीत असल्याने पोलीस वसाहत तरी कशी राहणार, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. परिणामी पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी नागपुरात राहणे पसंत करतात. अशात रात्रीच्या वेळी मोठी घटना, दुर्घटना किंवा पेच उद्भवल्यास कर्मचाऱ्यांना ठरावित वेळेत पोहोचता येत नाही. यासाठी वाडी पोलीस ठाण्यासह पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस क्वॉर्टर असणे आवश्यक आहे.
स्मार्ट पोलीस ठाण्याची गरज
वाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वसाहतीतील अवैध धंदे, गुन्हेगारी रोखण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या जागेसंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळून प्रशस्त, सुसज्ज असे पोलीस ठाणे अस्तित्वात येईल. स्मार्ट पोलीस ठाणे ही काळाची गरज आहे.
- नरेश पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाडी.
९० पोलिसांवर लाखांचा भार
वाडी पोलीस ठाण्यात सध्याच्या घडीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, सहा सहायक पोलीस उपनिरीक्षक, २३ हेडकॉन्स्टेबल, १३ नायक पोलीस शिपाई, २९ पोलीस शिपाई व १२ महिला पोलीस शिपाई असे ९० कर्मचारी कार्यरत आहे. या ९० पोलिसांवर एक लाखांवर लोकसंख्येचा भार आहे. येथे आरोपींना ठेवण्यासाठी लॉकअप रुम नसल्यामुळे एमआयडीसी किंवा हिंगणा पोलीस स्टेशनचा सहारा घ्यावा लागतो. याकडेही गृहखात्याचे आतापर्यंत लक्ष न जाणे ही शोकांतिका आहे. २०१७ मध्ये केंद्र शासनाकडे पाच एकर जागेचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.