परीक्षा न घेताही नागपूर विभाग तळालाच, अमरावती विभाग राज्यात ‘सेकंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:59 AM2021-07-17T10:59:29+5:302021-07-17T11:04:56+5:30
Nagpur News- कोरोना संक्रमणाने ना शाळा, ना परीक्षा तरीही निकालाने विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव केला आहे. नागपूर विभागात गाेंदिया तर अमरावती विभागात अकाेला, यवतमाळ जिल्हा ‘टाॅप’ ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर / अमरावती : परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नागपूर विभागात ९९.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी सतत तिसऱ्या वर्षी विभागाचा राज्यात शेवटचाच क्रमांक राहिला. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९९.८४ टक्के, तर पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ८७.६६ टक्के इतका आहे. त्या तुलनेत यंदा अमरावती विभागाचा निकाल ४.८४ टक्क्यांनी वाढून ताे ९९.९८ टक्के लागला. राज्यात कोकणनंतर अमरावती दुसऱ्या स्थानी आहे. कोरोना संक्रमणाने ना शाळा, ना परीक्षा तरीही निकालाने विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव केला आहे. नागपूर विभागात गाेंदिया तर अमरावती विभागात अकाेला, यवतमाळ जिल्हा ‘टाॅप’ ठरला.
दरवर्षी अगोदर बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदा परीक्षाविना निकाल हे सूत्र अवलंबविल्याने दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. नववी, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या ३०-३०-४० या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालाची टक्केवारी बघता शाळांनी विद्यार्थ्यांना भरभरून गुण दिल्याचे वास्तव आहे.
नागपूर विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्ये देखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७५ हजार ५०७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ४२१ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.४८ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.२१ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ६२ हजार १५९ पैकी १ लाख ६१ हजार ०९६ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.
अमरावती विभागात दहावीसाठी नोंदणी झालेले नियमित विद्यार्थी १ लाख ५८ हजार ८३९ होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार ८३७ मूल्यांकन प्राप्त असून, १ लाख ५८ हजार ८१६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी दहावीचा निकाल ९५.१४ टक्के लागला होता. यंदा निकालात ९९.९८ टक्के लागला आहे. विभागात इयत्ता दहावीसाठी १,६८,६०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६७,४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १ लाख ५९ लाख ३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकोला ९९.९९ टक्के, अमरावती ९९.९७ टक्के, बुलडाणा ९९.९८ टक्के, यवतमाळ ९९.९९ टक्के आणि वाशिम जिल्हा ९९.९८ टक्के निकाल जाहीर झाल्याची माहिती पत्रपरिषदेतून अमरावती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव नीलिमा टाके, सहसचिव जयश्री राऊत यांनी दिली.
गोंदिया जिल्हा नागपूर विभागात ‘टाॅप’
नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी सर्वांत जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १९ हजार ७१७ म्हणजेच ९९.६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातील नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून उत्तीर्णांची टक्केवारी ९९.२८ टक्के इतकी आहे तर विभागात उत्तीर्णांची सर्वांत कमी टक्केवारी चंद्रपूर जिल्ह्याची आहे. तेथे ३० हजार १२५ पैकी २९ हजार ८५५ म्हणजे ९९.१० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.