यंदाही बुद्ध पौर्णिमेला प्राणी प्रगणना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:43+5:302021-05-21T04:07:43+5:30
नागपूर : बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राण्यांची प्रगणना यंदाही होणार नाही. एवढेच नाही तर कोरोना संक्रमणामुळे यंदा या निसर्गानुभव उपक्रमावर ...
नागपूर : बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राण्यांची प्रगणना यंदाही होणार नाही. एवढेच नाही तर कोरोना संक्रमणामुळे यंदा या निसर्गानुभव उपक्रमावर बंधन घालण्यात आले आहे. तब्बल दुसऱ्या वर्षीही हा उपक्रम होणार नसल्याने वन्यजीव अभ्यासकांचा हिरमोड झाला आहे.
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात जंगलातील प्राण्यांची गणना केली जाते. मागील अनेक वर्षांपासून वन विभागात ही पद्धत प्रचलित होती. सारेच प्राणी पाणवठ्यावर रोज न येता त्यांच्या ठराविक वेळा असतात, या पद्धतीची गणना अचूकपणे होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर या पद्धतीने होणारी गणना बंद झाली होती. तरीही वन्यजीव अभ्यासकांना प्राण्यांचा अभ्यास जवळून करता यावा, जंगलातील पशु-पक्षी, रात्रीचे जंगलातील वातावरण याचा अनुभव निसर्गप्रेमींना मिळावा आणि जनजागृती व्हावी यासाठी वन विभागाने हा उपक्रम ‘निसर्गानुभव’ या नावाने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला कायम ठेवला होता. अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प, वनक्षेत्राच्या परिसरात तो मचाणावर बसून केला जायचा. मात्र मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा उपक्रम रद्द केला होता. येत्या २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा असली तरी कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाही हा उपक्रम रद्द करण्यात आला आहे.
पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षणात आवड असणाऱ्यांची या उपक्रमासाठी आठवडाभरापासून नोंदणी करण्यासाठी धावपळ असते. अनेक वन्यजीव अभ्यासक या पर्वणीची वर्षभर वाट पाहत असतात. मात्र लागोपाठ दोन वर्षापासून हा उपक्रम बंद असल्याने निसर्गानुभवाच्या आनंदाला ही मंडळी मुकली आहे.