पिस्तुलाच्या धाकावर इव्हेंट ऑर्गनायजरला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:12 PM2019-03-01T23:12:15+5:302019-03-01T23:18:29+5:30
नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बघण्यासाठी जात असलेल्या एका इव्हेंट ऑर्गनायजरला पिस्तुलाचा धाक दाखवून पाच आरोपींनी लुटले. त्याच्याजवळची २८ हजारांची रोकड लुटण्यापूर्वी आरोपींनी ‘मॅडमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा ठोक डालेंगे ’ अशी धमकीही दिली. अत्यंत संवेदनशील परिसर समजला जाणाऱ्या राजभवनसमोरच्या त्रिकोणी गार्डनजवळ गुरुवारी दिवसाढवळ्या ही खळबळजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बघण्यासाठी जात असलेल्या एका इव्हेंट ऑर्गनायजरला पिस्तुलाचा धाक दाखवून पाच आरोपींनी लुटले. त्याच्याजवळची २८ हजारांची रोकड लुटण्यापूर्वी आरोपींनी ‘मॅडमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा ठोक डालेंगे ’ अशी धमकीही दिली. अत्यंत संवेदनशील परिसर समजला जाणाऱ्या राजभवनसमोरच्या त्रिकोणी गार्डनजवळ गुरुवारी दिवसाढवळ्या ही खळबळजनक घटना घडली.
विजय राजकुमार जादोन (वय २५) असे पीडित तरुणाचे नाव आहे. विजय मूळचा दिल्लीचा रहिवासी असून तो सध्या शिवशक्ती अपार्टमेंट, वर्धमाननगरमध्ये राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो नागपुरात शर्मा नामक व्यक्तीसोबत इव्हेंट आॅर्गनायजर म्हणून काम करतो. विजयच्या तक्रारीनुसार, त्याने भागीदाराच्या मदतीने काटोल मार्गावरील अंडरमून लॉनमध्ये १५ मार्चला एका कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. हे लॉन बघण्यासाठी गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास विजय त्याच्या भागीदाराची दुचाकी घेऊन जात होता. त्याला लॉनच्या मार्गाची पक्की माहिती नसल्याने त्याने राजभवन समोरच्या त्रिकोणी गार्डनजवळ दुचाकी थांबवली. मोबाईलवर गुगल मॅपवरून तो लॉनचा मार्ग शोधत असताना अचानक बुलेट तसेच अन्य वाहनांवर आलेल्या पाच आरोपींनी त्याला गराडा घातला. सर्वांनी तोंडाला स्कार्फ बांधले होते. एका आरोपीने विजयची कॉलर पकडून त्याला कंबरेत पॅन्टमध्ये खोचलेले पिस्तुल दाखवले. ‘तुझ्या पार्टनरने मॅडमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार कशाला नोंदवली, अशी विचारणा करीत ती तातडीने मागे घ्यायला सांग. तुझ्या भागीदाराला एक-दोन वेळा समजावले. तू समजदार दिसतो, म्हणून तुला हे सांगत आहे, असे म्हणून आरोपींनी त्याला २४ तासात तक्रार परत घेतली नाही तर जीवे मारू’ अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या खिशात हात टाकून २८ हजारांची रोकड हिसकावून घेतली. पिस्तुल पाहून प्रचंड घाबरलेल्या विजय आरोपी निघून गेल्यानंतरही बराच वेळ एकाच ठिकाणी गप्प बसून राहिला. काही वेळेनंतर त्याने भागीदार शर्माला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर गिट्टीखदान ठाण्यात पोहचला. त्याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
कोण आहे मॅडम ?
ज्या मॅडमखातर आरोपींनी विजयला धमकावून रोकड हिसकावून नेली, ती मॅडम कोण आहे, या संबंधाने चौकशी केली असता पोलिसांकडून पुढीलप्रमाणे माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार, विजय आणि त्याचा भागीदार शर्मा या दोघांनी निधी नामक मॅडमसोबत रेशीमबागेत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकीट विक्रीची रक्कम मॅडमच्या खात्यात जमा झाली होती. सर्व खर्च वजा जाता उर्वरित २२ लाख रुपये ३० डिसेंबर २०१८ पर्यंत देण्याचे मॅडमने विजय आणि त्याच्या भागीदाराला सांगितले होते. मात्र, बराच वेळ टाळाटाळ केल्यानंतर मॅडमने आता रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. तिकडे देणेकरांचा तगादा लागल्याने विजय आणि भागीदाराची कोंडी झाली. परिणामी शर्माने सीताबर्डी ठाण्यात मॅडमविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली. ती परत घ्यावी तसेच रक्कम परत मागू नये म्हणून शर्माला काही जणांनी यापूर्वीही धमकावले होते, असे समजते.