अखेर नागपुरातील शिक्षकाच्या आत्महत्ये प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 02:50 PM2017-12-17T14:50:49+5:302017-12-17T14:52:24+5:30

विद्यार्थ्यासमोर मारहाण करून बदनामीची धमकी देत एका शिक्षकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अखेर परेश जामगडे (रा. नवा नकाशा, पाचपावली)सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Eventually, in the case of teacher's suicide four accused booked | अखेर नागपुरातील शिक्षकाच्या आत्महत्ये प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अखेर नागपुरातील शिक्षकाच्या आत्महत्ये प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देआरोपी फरार : जरीपटका पोलिसांची शोधाशोध

आॅनलाईन लोकमत
नागपूर : विद्यार्थ्यासमोर मारहाण करून बदनामीची धमकी देत एका शिक्षकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अखेर परेश जामगडे (रा. नवा नकाशा, पाचपावली)सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संदीप उर्फ सोनू विरेंद्रनाथ विश्वास (वय ४२, रा. सूवर्णनगर, जरीपटका) असे आत्महत्या करणा-या शिक्षकाचे नाव आहे. ते पाचपावलीतील आवळेबाबू चौकात खासगी शिकवणी वर्ग चालवित होते. वर्गात मोबाईलवर चॅटिंग करणा-या एका विद्यार्थीनीला त्यांनी हटकले. ही माहिती कळाल्यानंतर ११ डिसेंबरला दुपारी आरोपी जामगडे आपल्या तीन साथीदारांसह शिकवणी वर्गात आला. विद्यार्थीनींसोबत अश्लिल वर्तन करतो, असा आरोप लावून जामगडे आणि त्याच्या साथीदारांनी विश्वास यांना मारहाण केली. बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना ३ लाख, २७ हजारांची खंडणी मागितली. न दिल्यास ट्यूशन क्लासेस चालवू न देण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली. विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांसमोर झालेल्या अपमाणामुळे विश्वास व्यथित झाले. या अवस्थेत त्यांनी १२ डिसेंबरला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटका पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस चौकशीत विश्वास यांच्या आत्महत्येला आरोपी जामगडे आणि त्याचे तीन साथीदार कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक एस. बदोले यांनी जामगडेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलीसही दोषी
विश्वास यांच्या मृत्यूला पाचपावलीतील चव्हाण नामक पोलीस अधिकारीही दोषी असल्याची चर्चा आहे. आत्महत्येच्या आदल्या सायंकाळी विश्वास पाचपावली ठाण्यात गेले होते. जामगडे आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण करून बदनामी केली. तो खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी मागत असल्याचे सांगून विश्वास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी ठाण्यात असलेल्या चव्हाण नामक पोलीस अधिका-याने त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. उलट आरोपींना ठाण्यात बोलवून समेट घडवून आणण्यासाठी विश्वास यांच्यावर दडपण आणले. एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर उद्या या, असे म्हणत विश्वास यांना परत पाठविले. आरोपींना पोलिसांचे पाठबळ असल्याचे लक्षात आल्यामुळे विश्वास यांनी आत्महत्या केली. त्यामुळे चव्हाण हे सुद्धा त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होत असून, चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

 

Web Title: Eventually, in the case of teacher's suicide four accused booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.