अखेर ‘मेयो’ला आली जाग : अत्याचारपीडितेच्या उपचारांच्या खर्चाची भरपाई देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:09 AM2018-10-30T00:09:50+5:302018-10-30T00:14:34+5:30
अत्याचारपीडित गरीब मुलीच्या कुटुंबीयांना दुसरीकडे उपचारासाठी पैसे मोजण्यासह बाहेरून औषधे आणायला लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘मेयो’ इस्पितळाचे प्रशासन चांगलेच हादरले. अत्याचारपीडितेच्या उपचारांवर झालेल्या सर्व खर्चाची भरपाई देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अत्याचारपीडित गरीब मुलीच्या कुटुंबीयांना दुसरीकडे उपचारासाठी पैसे मोजण्यासह बाहेरून औषधे आणायला लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘मेयो’ इस्पितळाचे प्रशासन चांगलेच हादरले. अत्याचारपीडितेच्या उपचारांवर झालेल्या सर्व खर्चाची भरपाई देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केले होते.
आर्थिक स्थिती नसताना अत्याचारपीडित मुलीवर उपचाराचे पैसे जमा करताना कुटुंबाला मोठ्या अडचणीतून जावे लागले.
नातेवाईकांनी रुग्णालयाने एमआरआय व अल्ट्रासाऊंड पैसे भरल्यावर उपचार केले गेले. पीडित मुलीला नि:शुल्क उपचार मिळायला हवेत. मात्र ‘मेयो’ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारी ‘मेयो’तील अधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अधिष्ठात्यांनी आम्हाला येऊन सर्व खर्चाची देयके सादर करण्यास सांगितले. हे सर्व पैसे परत करण्यात येतील, असे आश्वासन आम्हाला दिल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
याबाबत ‘मेयो’चे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना संपर्क केला असता, यापुढे पीडितेला सर्व औषधे वॉर्डातच देण्यात येतील. या मुलीला मोफत औषधोपचार मिळत होते. परंतु शनिवार-रविवार असल्यामुळे वॉर्डामध्ये ‘ज्युनिअर’ डॉक्टर उपस्थित होते. त्यांना नियमावलीचा विसर पडला असावा. त्यामुळेच या दोन दिवसात औषधांचे पैसे भरावे लागले. मात्र संबंधित औषधे फारशी महाग नव्हती. भविष्यात अशाप्रकारची घटना होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले.
मात्र अधिष्ठात्यांचा हा दावा कुटुंबातील एका सदस्याने खोडून काढला. आम्हाला पहिल्या दिवसापासून ‘मेयो’तील कर्मचाऱ्यांनी बाहेरून औषधे आणायला लावली. उपचार मोफत आहेत हे सांगण्याची कुणीही तसदी घेतली नाही, असे त्यांनी म्हटले.
प्रशासन माणुसकी दाखविणार का?
मुलीचे पालक हे अशिक्षित आहेत व मुलीवर झालेल्या अन्यायामुळे ते हादरले आहेत. अशास्थितीत अनेक देयके त्यांच्याकडून हरविली आहेत. मात्र प्रशासनाकडे सर्व गोष्टींची नोंद आहे. अशास्थितीत प्रशासन त्यांना मदत करण्याची माणुसकी दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षाव्यवस्था वाढविली
दरम्यान, संबंधित पीडितेला किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी अभ्यागत आल्याचे दिसून आले. ती मुलगी अजूनही मानसिक धक्क्यात आहे. तिला वेगळ्या वॉर्डात ठेवले तर तिला आणखी एकटे वाटेल. त्यामुळे तिला जनरल वॉर्डात ठेवण्यात आले आहे. आम्ही सुरक्षाव्यवस्थादेखील वाढविली आहे आणि तिच्या उपचारात कुठलीही कसूर होणार नाही, असे डॉ. केवलिया यांनी सांगितले.