अखेर नागपूर विद्यापीठाला आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:41 PM2018-09-05T22:41:44+5:302018-09-05T22:44:45+5:30
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीची तारीखच बदलविण्याचा प्रताप करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाला अखेर जाग आली. यासंदर्भात तातडीने बदल करत विद्यापीठाने संकेतस्थळावर सुधारित परिपत्रक ‘अपलोड’ केले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीची तारीखच बदलविण्याचा प्रताप करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाला अखेर जाग आली. यासंदर्भात तातडीने बदल करत विद्यापीठाने संकेतस्थळावर सुधारित परिपत्रक ‘अपलोड’ केले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष
११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक धर्मसंसदेत ऐतिहासिक भाषण केले होते व भारताची ख्याती जगभरात गेली होती. या भाषणाला १२५ वर्ष होत असल्यामुळे देशभरातील अनेक ठिकाणी हा दिवस दिग्विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठातदेखील हा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला होता.
त्यानुसार विद्यापीठाने २ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले व हा दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग, संचालित महाविद्यालये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले. स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी असते. मात्र परिपत्रकात ११ सप्टेंबर २०१८ रोजी स्वामी विवेकानंद यांची १२५ वी जयंती असल्याचे नमूद होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने यात बदल केले व सुधारित परिपत्रक जारी केले.
सर्व महाविद्यालयांत ‘दिग्विजय दिवस’ अनिवार्य
दरम्यान, नवीन परिपत्रकानुसार विद्यापीठातील सर्व विभाग व महाविद्यालयात ‘दिग्विजय दिवस’ साजरा करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आयोजनाचा अहवाल विभाग व महाविद्यालयांना छायाचित्रांसह विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकांकडे पाठवायचा आहे, असे विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिलीप कावडकर यांनी स्पष्ट केले आहे.