अखेर रेमडेसिविरचा पुरवठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:05+5:302021-04-23T04:10:05+5:30
नागपूर : रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा तुटवडा झेलणाऱ्या नागपुरातील रुग्णांना गुरूवारी थोडा दिलासा मिळाला. जिल्हा प्रशासनाने एकूण ५,८९९ इंजेक्शनचा पुरवठा रुग्णालयांना ...
नागपूर : रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा तुटवडा झेलणाऱ्या नागपुरातील रुग्णांना गुरूवारी थोडा दिलासा मिळाला. जिल्हा प्रशासनाने एकूण ५,८९९ इंजेक्शनचा पुरवठा रुग्णालयांना केला. असे असले तरी रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी सुरू असलेली भटकंती अद्यापही थांबलेली दिसत नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी १० हजार इंजेक्शन नागपूरला देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. यानंतरही सोमवारी ४,२१३ आणि मंगळवारी फक्त ७०० इंजेक्शन मिळाले. तर बुधवारी १,३३१ रेमडेसिविर मिळाले. मात्र आज गुरुवारी ५,८९९ इंजेक्शन मिळाल्याने रुग्णालयांना बराच दिलासा मिळाला आहे. असे असले तरी गरज पूर्ण भागलेली नाही. मागणी कायमच आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने पुरवठा प्रक्रिया पारदर्शी राखण्यासाठी पुरवठ्याची यादी वेबसाईटवर जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच, ते रुग्णालयांना वितरित केले जात आहेत. अन्न व औषधी प्रशासनाकडून या औषधाचा काळाबाजार थांबविण्यासाठी पथकांचे गठन केले आहे. रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर औषध आणण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे नातेवाईकांची भटकंती सुरूच आहे. यामुळेच काळाबाजार वाढला आहे.