कधी हाेतील भीमा भेटीगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:27+5:302021-04-14T04:08:27+5:30
नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह अवर्णनीय असताे. मात्र गेल्या वर्षीपासून काेराेनाचा प्रकाेप ...
नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह अवर्णनीय असताे. मात्र गेल्या वर्षीपासून काेराेनाचा प्रकाेप वाढल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. अनुयायांमध्ये निराशा आहे, पण खंत नाही. ज्या महामानवामुळे सर्वस्व मिळाले, त्यांची जयंती घरातही साजरी करणे शक्य आहे़ काेराेनामुळे सर्वत्र दु:ख व चिंतेचे सावट आहे, त्यामुळे उत्सवापेक्षा अभिवादनाला अनुयायांनी प्राधान्य दिले आहे़
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र
महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी १० वाजता कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे माेजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयाेजित करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. तत्पूर्वी पूजनीय भिक्षू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना घेण्यात येईल. वाढत्या कोरोना संक्रमणाला लक्षात घेता व राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून घरीच बाबासाहेबांची जयंती साजरी करावी, असे आवाहन ॲड. कुंभारे यांनी केले.
विचारमंथनची सांगता आज
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘खूप लढलाे बेकीने, आता लढूया एकीने’ टीमच्या वतीने ७ एप्रिलपासून ‘विचारमंथन’ या वैचारिक उत्सवाचे ऑनलाइन आयाेजन केले आहे. तरुणांसमाेरील शिक्षण, बेराेजगारीच्या समस्या, मुलांमध्ये टीव्ही, माेबाइलचे वाढलेले वेड, तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता अशा विविध विषयांवर या सात दिवसांत चर्चा करण्यात आली. १४ एप्रिल राेजी या वैचारिक उत्सवाची सांगता हाेणार असल्याची माहिती अतुल खाेब्रागडे यांनी दिली़
ऑनलाइन प्रबाेधन कार्यक्रमांचे आयाेजन
सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य नसले तरी समता सैनिक दलासह विविध संघटनांच्या वतीने वैचारिक, सांस्कृतिक व प्रबाेधनात्मक कार्यक्रमांचे ऑनलाइन आयाेजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या फेसबुक लाइव्ह व्याख्यानासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे ऑनलाइन आयाेजन करण्यात आले आहे.