नागपूरच्या प्रणवने गाठले माऊंट एव्हरेस्ट, 14 गिर्यारोहकांच्या चमूची अतुलनीय कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 05:00 PM2019-05-20T17:00:00+5:302019-05-20T17:02:43+5:30
नागपूरच्या प्रणव बांडबुचे या युवा गिर्यारोहकासह 14 जणांच्या चमूने सोमवारी सकाळी 8,300 मीटर उंच असलेले जगातील सर्वाधिक उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत अतुलनीय कामगिरी केली आहे.
नागपूरः नागपूरच्या प्रणव बांडबुचे या युवा गिर्यारोहकासह 14 जणांच्या चमूने सोमवारी सकाळी 8,300 मीटर उंच असलेले जगातील सर्वाधिक उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत अतुलनीय कामगिरी केली आहे. इमॅजिन नेपाळ ट्रेकचे व्यवस्थापकीय संचालक मिनग्मा ग्यालजे शेर्पा यांच्या मार्गदर्शनात सात गिर्यारोहक आणि सात शेर्पाची चमू माऊंट एव्हरेस्टवर सोमवारी सकाळी पोहोचली.
या चमूत प्रणव बांडबुचे हा एकमेव भारतीय गिर्यारोहक होता. त्याच्यासोबत ग्रीसचे फ्लॅमपौरी ख्रितिना व आर्कोन्टीदो वासिलिकि, चिनचे जिया लिन चांग, लियू याँगझाँग, वँग झ्यू फेंग आणि झेंग हूयी वेन, किली पेम्बा शेर्पा, दावा तेनझीन शेर्पा, टॅमटींग शेर्पा, लक्पा तमंग, दावा ग्यालजे शेर्पा, फुर्बा छोतर शेर्पा आणि देंडी शेर्पा यांचा समावेश होता. किली पेंम्बा व आर्कोन्टीदो वासिलिकि हे दोघे समीट पॉइंटला सकाळी ८ वाजता पोहोचले तर उर्वरित सर्वांनी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी माऊंट एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर सर्वच गिर्यारोहक कॅम्प 4 कडे रवाना झाले.
सीएसी ऑलराउंडर या साहसी संस्थेचा सदस्य असलेला प्रणव हा विदर्भातला युवा गिर्यारोहक असून अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनीअरिंग ॲण्ड अलाइड स्पोर्टस येथून त्याने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड असे हनुमान तिब्बा हे शिखर पार करणारा प्रणय हा पहिलाच नागपूरकर आहे. माऊंट देव तिब्बा, माऊंट शितीधर आणि युरोपातील सर्वाधिक उंच शिखर माऊंट एल्ब्रसवर देखील त्याने भारताचे निशाण फडकावले आहे.
प्रणय सायकलिंगची देखील आवड आहे. त्याने २०० आणि ३०० किलोमीटरची ब्रेव्हेटदेखील पूर्ण केली आहे. एव्हरेस्ट मोहिमे साठी लागणारी शारीरिक तयारी त्याने डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली केली.कुटूंबात आई व लहान भाऊ, बहीण असलेल्या प्रणवचे कुटुंब शेतकरी आहे. इमॅजिन नेपालची चमू सोमवारी माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली चमू ठरली, असे बेस कॅम्पचे लायसग्यानेंद्र श्रेष्ठा यांनी कळविले आहे. माऊंट एव्हरेस्ट समीटचा मार्ग पुढच्या तीन ते चार दिवसांसाठी खुला राहणार असून सुमारे दोनशे गिर्यारोहक या काळात माऊंट एव्हरेस्टवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील.