निवडणुकांतील प्रत्येक उमेदवार ‘डॉलरपती’
By admin | Published: February 6, 2017 03:49 PM2017-02-06T15:49:58+5:302017-02-06T15:49:58+5:30
महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत असताना प्रत्येक उमेदवार हा ‘डॉलरपती’ झाला आहे.
Next
निवडणुकांतील प्रत्येक उमेदवार ‘डॉलरपती’
निवडणूक आयोगाची घोडचूक : हा ‘ट्रम्प इफेक्ट’ तर नाही ना? : प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख रुपयांत नाहीच
निवडणूक आयोगाची घोडचूक : हा ‘ट्रम्प इफेक्ट’ तर नाही ना? : प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख रुपयांत नाहीच
योगेश पांडे
नागपूर : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे विराजमान झाल्यापासून जगभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्य निवडणूक आयोगावर देखील बहुधा ‘ट्रम्प’ यांचा ‘इफेक्ट’ झाला आहे. म्हणूनच की काय महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत असताना प्रत्येक उमेदवार हा ‘डॉलरपती’ झाला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल केलेला एकही उमेदवार गरीब नसून प्रत्येक उमेदवार चक्क अनेकपटींनी श्रीमंत झाला आहे. वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल, मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या मेहेरबानीने हे कागदपत्रांवर तरी खरे झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यंदा मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या पद्धतीत बदल केला व उमेदवारांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करून अर्ज भरणे अनिवार्य केले. यानुसार ३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करायचे होते व यात संपत्तीचे विस्तृत विवरण भरायचे होते. सर्व माहिती भरल्यानंतर मग ‘नोटरी’ करून अर्जाची प्रत प्रत्यक्ष सादर करायची होती.
निवडणुकांच्या संकेतस्थळावर प्रत्येक उमेदवाराने दाखल केलेले शपथपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. निवडणुकांसाठी दाखल केलेल्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात उमेदवारांच्या संपत्तीचा उल्लेख हा रुपयांऐवजी चक्क ‘डॉलर’मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत असताना देखील उमेदवार ‘डॉलरपती’ झाले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांना याबाबतीत काहीही कल्पना नाही. ‘डॉलर’मधील संपत्ती पाहून अनेक उमेदवारांना तर अगोदर धडकीच भरली.
...तर उमेदवार ६७ पटींनी श्रीमंत
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या शपथपत्रातील माहिती खरी मानली तर जवळपास प्रत्येक उमेदवाराची संपत्ती ही ‘डॉलर’मध्ये दर्शविण्यात येत आहे. आजच्या तारखेतील दराने रुपयांमध्ये दर काढला तर प्रत्येक उमेदवार ६७ पटींनी श्रीमंत होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही तांत्रिक चूक आहे.
अधिकारी अनभिज्ञच
प्रतिज्ञापत्रातील या ‘डॉलर’ नीतीसंदर्भात निवडणुकांशी संबंधित अधिकारी अनभिज्ञच आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. सर्व ‘प्रोग्रॅमिंग’ राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. मनपाकडे ही जबाबदारी नव्हती. त्यामुळे नेमका गोंधळ कशामुळे झाला आहे, ते आयोगच सांगू शकेल, असे त्यांनी सांगितले. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक चूक झाली. ‘प्रोग्रॅमिंग’ करताना ‘रुपया’ ऐवजी ‘डॉलर’चे चिन्ह ‘फीड’ करण्यात आले. त्यामुळेच हा प्रकार झाला असल्याची माहिती एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. प्रथमदर्शनी ही चूक क्षुल्लक वाटत असली तरी यामुळे अनेक उमेदवारांच्या संपत्तीने मात्र ‘कोटीच्या कोटी’ झेप घेतली आहे.