प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी : संजय यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:52 AM2019-06-27T00:52:15+5:302019-06-27T00:54:59+5:30
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी केले.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, जिल्ह्यातील सामाजिक विकास शक्तीप्रदत्त समिती, समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त विजय वाकुलकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे, सहायक आयुक्त कार्यालयाचे समाज कल्याण अधिकारी अनिल वाळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रास्ताविकेत सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. संचालन प्रकल्प समन्वयक बादल श्रीरामे यांनी केले.
आंतरजातीय विवाह करणारे जोडपे सन्मानित
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांच्या हस्ते आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना तसेच शाळेतून, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारा’च्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच रमाई घरकुल योजनेअंर्तगत लाभार्थ्यांना तिसºया हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय, नागपूरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘परिवर्तन’ या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.