जागतिक अन्न दिवस; नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:08 PM2018-10-15T23:08:12+5:302018-10-16T10:04:57+5:30
भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे. ३० लाख लोकसंख्येच्या या शहरात रोज तीन ट्रक अन्न कचऱ्यात फेकले जाते, हे अधिक गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अन्न नासाडी ही चिंताजनक आणि संतापजनक असली तरी नागपुरात सार्वजनिक प्रसंग, उत्सव किंवा पारिवारिक समारंभ व हॉटेल्समध्ये सर्वात जास्त अन्न नासाडी होते. तज्ज्ञांच्या मते, पंक्ती, जेवणावळींमध्ये वाढणारा आणि खाणारा यांचा मेळ नसतो. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. अन्नाची नासाडी कमी व्हावी यातून बुफेची संकल्पना पुढे आली. त्यातून नासाडी कमी होणे दूरच, ती पंगतीपेक्षाही दुपटीने वाढली आहे. महागाईत प्रचंड वाढ झाली आहे, हे खरे असले तरी नवश्रीमंत वर्ग, उच्च मध्यम व मध्यमवर्गाकडून ‘हॉटेलिंग'चा वापर वाढला आहे. आॅर्डर करताना पूर्वअंदाज न घेता डिशेशची मागणी केली जाते. भूकेचा अंदाज न घेतला गेल्याने बऱ्याचदा अन्न शिल्लक राहते. त्याचा परिणाम हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात शिळे अन्न फेकले जाते. गरजेपेक्षा दोन घास कमीची आॅर्डर केल्यास अन्नाची नासाडी टाळता येणार आहे. परंतु शहरात तसे होताना दिसून येत नाही. महापालिकेच्या हद्दीत सुमारे दोन हजारावर हॉटेल्स आहेत. यातील अनेक हॉटेल्सचालक उरलेले अन्न रात्री उशिरा कचरापेटीत किंवा नाल्यात फेकतात तर काही नियमानुसार मनपाकडे सुपूर्द करतात. अशा हॉटेल्सची केवळ ९०० वर संख्या आहे. त्यांच्याकडून रोज १५ टन शिळे अन्न मिळते. नागपुरात अर्धपोटी व उपासमार सहन करीत जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. रोज वाया जणाऱ्या या अन्नावर या भूकेल्यांना चार घास मिळू शकतील एवढे हे अन्न आहे.
विचार करायला हवा
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी अन्न खाताना विचार करायला हवा. त्यामुळे अन्नसाठा, साधनसंपत्ती वाचेल, भूकेल्यांना अन्न मिळेल आणि प्रदूषणावरही नियंत्रण येईल. अन्नासाठी आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करीत असल्याने अन्नाचे नियोजन केल्यास ते तसेच साधनसंपत्तीही वाया जाणार नाही. अन्नाची नासाडी थांबविल्यास दूषित वायूची निर्मिती व त्यामुळे होणारे पर्यावरण प्रदूषणही थांबेल.
प्यारे खान
सामाजिक कार्यकर्ता