नागपुरात दररोज पाच हजारांवर गरजूंची भागतेय भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:40 AM2020-04-24T11:40:17+5:302020-04-24T11:40:40+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्तात भोजन देणारा उपक्रम म्हणून दीनदयाल थाली प्रकल्पाची ओळख आहे. या ठिकाणी भोजन तयार करून दररोज शहरातील पाच हजारांहून अधिक गरजू नागरिकांना पाकीटबंद स्वरूपात ते पोहचविणे सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्तात भोजन देणारा उपक्रम म्हणून दीनदयाल थाली प्रकल्पाची ओळख आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीत केंद्रात बसून भोजन करणे बंद आहे. मात्र तरीदेखील प्रकल्पाचा सेवाभाव कायम आहे. या ठिकाणी भोजन तयार करून दररोज शहरातील पाच हजारांहून अधिक गरजू नागरिकांना पाकीटबंद स्वरूपात ते पोहचविणे सुरू आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाºया गरीब रुग्णांचे नातेवाईक भूक मारून राहायचे. त्यांची समस्या लक्षात घेऊन महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून परिसरात दीनदयाल थाली केंद्र सुरू झाले. शहरातील अनेक दानदात्यांचेदेखील सहकार्य लाभले. कोरोनाच्या संकटाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याने या केंद्रात बसून जेवणाची सोय बंद करण्यात आली आहे. परंतु या माध्यमातून शहरातील गरीब नागरिकांची नियमित सेवा सुरू आहे.
या केंद्रात दररोज पाच हजारांहून अधिक नागरिकांसाठी भोजन तयार करण्यात येते. त्यानंतर सुमारे हजार लोकांच्या भोजनाचे केंद्रातच पॅकिंग होते व शहरातील गरजूंपर्यंत त्यांचे वितरण करण्यात येते. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता राखण्यावर विशेष भर असतो. शहरातील विविध भागातील नगरसेवकांच्या माध्यमातून वितरणाचे कार्य करण्यात येत आहे. उर्वरित चार हजारांहून अधिक लोकांचे जेवण नगरसेवकांना पोहचविण्यात येते. त्यांना पॅकिंगचे साहित्यदेखील पुरविण्यात येते. नगरसेवक या भोजनाचे पॅकिंग करून मग गरजूंपर्यंत पोहचवितात. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठीदेखील हे फूड पॅकेट्स उपलब्ध आहेत. शहरात शिकणाºया विद्यार्थ्यांसाठीदेखील केंद्रातून दररोज फूड पॅकेट पोहचविले जातात. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेचा महापौर स्वत: नियमितपणे आढावा घेत आहेत.
दानदात्यांची मदत
गरजूंचे पोट भरण्यासाठी सुरू असलेल्या या प्रकल्पाला शहरातील दानदात्यांचीदेखील साथ मिळते आहे. काही जण निधीच्या माध्यमातून मदत करत आहेत. तर बरेच जण थेट शिधा किंवा भाजीपाला आणून देत आहेत. काही जण वितरणासाठीदेखील पुढाकार घेताना दिसून येत आहेत.