दर पाच मिनिटांनी, एकाला ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:02+5:302021-07-23T04:07:02+5:30
नागपूर : जगातील सर्व वयोगटातील २८ लाखाहून अधिक लोक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ने ग्रस्त आहेत. दर पाच मिनिटांनी, जगात एकाला ...
नागपूर : जगातील सर्व वयोगटातील २८ लाखाहून अधिक लोक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ने ग्रस्त आहेत. दर पाच मिनिटांनी, जगात एकाला हा आजार होतो. या आजारामुळे अपंगत्व येत असल्याने आजाराची जनजागृती होणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘डब्ल्यूएफएन’चे अध्यक्ष डॉ. विलियम कॅरोल यांनी केले.
‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी’च्या (डब्ल्यूएफएन) ८ व्या वार्षिक जागतिक मेंदू दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. ‘मल्टीपल स्क्लेरोसिस’बद्दल जागरूकता वाढविणे आणि त्याचा रुग्णांवर होणारा परिणाम कमी करणे या संकल्पनेवर ‘डब्ल्यूएफएन’ काम करणार असल्याचेही डॉ. कॅरोल म्हणाले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. टिस्सा विजेरत्ने होते. ते म्हणाले, काही दशकांपूर्वी ‘मल्टीपल स्क्लेरोसिस’(एमएस) हा रोग भारतात दुर्मिळ मानला जायचा. परंतु आता न्यूरोलॉजिस्टची संख्या वाढल्यामुळे तसेच ‘एमआरआय’ उपलब्ध झाल्याने रोगाचे निदान होत आहे. सुमारे १० लाख व्यक्तींमध्ये ५ ते १० इतके या रोगाचे प्रमाण आहे.
-अनुवांशिक व पर्यावरणीय घटक कारणीभूत-डॉ. सिंघल
बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथील न्यूरोसायन्सचे संचालक डॉ बी.एस. सिंघल म्हणाले, ‘मल्टीपल स्क्लेरोसिस’ मध्ये मेंदू आणि पाठीचा कणा येथील मायलिनचा थर खराब होतो. ‘एमएस’चे नेमके कारण माहीत नाही, अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक दोन्ही गुंतले आहेत. ‘आयएएन’चे अध्यक्ष डॉ. जेएमके मूर्ती म्हणाले की, हा एक ‘ऑटोम्युन्यून डिसऑर्डर’ आहे.
-महिलांमध्ये ‘एमएस’चे प्रमाण अधिक -डॉ. मेश्राम
‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप ऑफ डब्ल्यूएफएन’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’मध्ये मुंग्या येऊन शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायामध्ये कमजोरी येते, हालचालमध्ये असंतुलन, थरथरणे, थकवा, वेदना, दृष्टिदोष, दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, मूत्राशय, पोटाचे विकार आणि लैंगिक समस्या यासह अनेक लक्षणे आढळून येतात. महिलांमध्ये रोगाचे प्रमाण अधिक आहे. २५ ते ३० या वयोगटात वयात याची सुरुवात होते. या रोगामध्ये रुग्णाला अपंगत्व येऊन त्याचे पुढील जीवन अडचणीत येते.