प्रत्येक रुग्णालयात लागणार दरपत्रक : आरोग्यमंत्री राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:18 PM2020-09-25T21:18:14+5:302020-09-25T21:20:36+5:30
खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पाहता सर्वच रुग्णालयांमध्ये दरपत्रकाचा तक्ता लावणे बंधनकारक करण्यात आले असून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दर तक्ता लावणे बंधनकारक आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पाहता सर्वच रुग्णालयांमध्ये दरपत्रकाचा तक्ता लावणे बंधनकारक करण्यात आले असून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दर तक्ता लावणे बंधनकारक आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच रेमडेसिवीर औषधाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. प्रत्येक रुग्णाला हे औषध देण्यात येत आहे. लक्षण नसलेल्या रुग्णाला हे देण्याची गरज नाही. त्यामुळे याच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. त्यानुसारच वापर करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषध देण्यात येते. त्यामुळे याचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात या औषधांचा तुटवडा नाही. १ लाख औषधी महिनाभरात मिळतील. या औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेमडेसिवीर औषध संजीवनी नाही. कुणाला आणि किती प्रमाणात औषधी द्यायची याबाबतचे निर्देश सर्व रुग्णालयांना देण्यात येणार आहे. तपासणीबाबत दर निश्चित करण्यात आले आहेत. यापेक्षा जास्त दर आकारण्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्राधिकरणाला दिलेत. सामान्य नागरिकांनी यापेक्षा जास्त रक्कम देता कामा नये. हे दर माहिती होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात दरपत्रक लावण्याचे निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. रुग्णाकडून लाखो रुपये जमा ठेव घेणे अयोग्य असून ती घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. उपस्थित होते.
डॉक्टरांच्या व्यवस्थेवरही नाराजी
कोरोनासाठी सर्वांनी सेवा दिली पाहिजे. येथील डॉक्टर सात दिवस सेवा दिल्यानंतर सात दिवस गृहविलगीकरणात असतात. यामुळे कामावर परिणाम होतो. इतर ठिकाणी असे नाही. सात दिवत कोरोना वॉर्डात काम केल्यानंतर एक दिवस सुटी दिली पाहिजे. त्यानंतर सात दिवस बिगर कोरोना वॉर्डात सेवा दिली पाहिजे. पुन्हा एक दिवसाच्या सुटीनंतर कोरोना वॉर्डात सेवा देणे आवश्यक. अशा प्रकारची ड्युटी लावण्याचे निर्देश मेडिकल प्रशासनाला त्यांनी दिले.
डॅश बोर्ड अधिक सक्षम करा
येथील डॅश बोर्ड व्यवस्थेवरही राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णांना वेळेत ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि खाट मिळणे आवश्यक आहे. आपल्याकडे किती ऑक्सिजन आहे, रुग्णवाहिकाची स्थिती काय आहे, याची अद्ययावत माहिती असली पाहिजे. या करिता डॅश बोर्ड अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या करिता दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
ऑक्सिजनचा तुटवडा नाही
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. केंद्राकडून याचे दर वाढविण्यावर विचार सुरू आहे. त्यांच्याकडून वाढ करण्यात आल्यानंतर ते लागू होतील. राज्याकडून सध्या यात वाढ होणार नाही.
राजेंद्र शिंगणे,अन्न औषध प्रशासन मंत्री
महत्त्वाचे मुद्दे
अँटीजन टेस्टपेक्षा आरटीपीसीअर टेस्टवर भर देण्याचे निर्देश
ट्रेसिंगची संख्या ५ वरून १५ करण्याचे निर्देश
कोरोना रुग्णांच्या छातीच्या सीटी स्कॅनसाठी ६ ते ८ हजार रुपये घेण्यात येत होते. ते आता २ ते ३ हजार करण्यात आलेत
प्लाज्मा थेअरपीकरिता ५५०० रुपये लागतील
महात्मा जोतीराव आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना कॅशलेस सुविधा
खासगी रुग्णालयातील ८० खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव
मृत्यूदर कमी करण्याची गरज
रुग्णांना वेळेत ऑक्सिजन व रुग्णवाहिका मिळावी
ज्यादा बिल आकारणी केल्यास रुग्णालयांवर कारवाई
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीत कोरोनाचा समावेश करा