प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीने घ्यावी कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:44+5:302021-01-10T04:07:44+5:30

कोरोना व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स कोणते? सौम्य असे साईड इफेक्ट्स आहेत. परंतु, ते दुसऱ्या मात्रेनंतरच दिसून येतील. यात लस लावण्यात ...

Every important person should get the corona vaccine | प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीने घ्यावी कोरोनाची लस

प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीने घ्यावी कोरोनाची लस

Next

कोरोना व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स कोणते?

सौम्य असे साईड इफेक्ट्स आहेत. परंतु, ते दुसऱ्या मात्रेनंतरच दिसून येतील. यात लस लावण्यात आलेल्या जागेवर दुखणे, ताप, थकवा आणि डोकेदुखीची लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे केवळ एक किंवा दोन दिवस असू शकतात. तुमच्या रोग प्रतिकार क्षमतेवर (इम्युन सिस्टम) लसीकरणाचे योग्य परिणाम होत असल्याचे, हे संकेत होत. अमेरिकेत केवळ ०.२ टक्के लोकांमध्येही ही लक्षणे गंभीर प्रकारे दिसून आली होती. भारतात लस दिल्यानंतर तुमच्यावर १५ ते ३० मिनिटे नजर ठेवली जाणार आहे. लसीकरणानंतर ॲलर्जिक रिॲक्शन होणार नाही, यासाठी ही दक्षता असेल. सामान्यत: लोकसंख्येच्या मोठ्या घटकासाठी ही व्हॅक्सिन पूर्णत: सुरक्षित आहे.

लसीमुळे कोरोना संक्रमण होईल का?

लसीकरणामुळे कोरोना संक्रमण होण्याची कुठलीच शक्यता नाही. व्हॅक्सिनमध्ये मूळ विषाणू नसतो. वास्तवात व्हायरल प्रोटिन तुमच्या शरीरातील इम्युन सिस्टीमला प्रोत्साहित करतो आणि त्यामुळे विषाणूला निष्क्रिय करणारी ॲण्टीबॉडिज तयार होत असते. हीच ॲण्टीबॉडिज तुम्हाला विषाणूपासून वाचवते.

भारतात उपलब्ध झालेली लस १०० टक्के प्रभावी आहे का?

लस घेतल्यानंतर ७० ते ८० टक्के लोकांना याचा लाभ होईल. लसीकरणामुळे निर्माण झालेली इम्युनिटी जवळपास एक वर्ष राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्येकाला वार्षिक लसीकरणाची शिफारस केली जाऊ शकते.

ज्यांची इम्युन सिस्टीम योग्य प्रतिसाद देणार नाही, त्यांचे काय?

त्यांनाही लसीकरणाचा लाभ होईल. त्यांना कोरोना संक्रमण झालेच तरीही ते अत्यंत सौम्य असेल. त्यांचा आरटीपीसीआर टेस्ट पॉजिटिव्ह येऊ शकतो. परंतु, लक्षण कुठलेच नसतील. संक्रमणामुळे त्यांचा मृत्यू होणार नाही. ज्यांचे लसीकरण झाले ते संक्रमण पसरवणार नाही आणि त्यांना संसर्गही होणार नाही. ही हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल म्हणू या. जर ६० टक्के लोकसंख्येचे कोरोना विरोधात इम्युनायजेशन होत असेल तर ही महामारी नियंत्रणात येईल. म्हणूनच लसीकरणासाठी महत्त्वाच्या व्यक्तींनी सकारात्मक विचार करणे अभिप्रेत आहे.

कोरोना संक्रमित झाल्यावरही लसीकरण गरजेचे आहे?

होय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुम्हाला यापूर्वी कोरोना संक्रमण झाले असेल तर तुम्हाला लस घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमित झालेल्यांच्या शरीरात ॲण्टिबॉडिज निर्माण झाल्याने त्यांना पुन्हा संक्रमित होण्यापासून संरक्षण जरूर मिळते. मात्र, ही ॲण्टिबॉडिज व्यक्ती सुदृढ झाल्यानंतर पुढचे किती दिवस कायम राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळेच, लसीकरण गरजेचे आहे.

मुलांना लसीकरण गरजेचे आहे का?

लहान मुलांवर या व्हॅक्सिनचे परीक्षण झालेले नाही. त्या दिशेने योग्य परिणाम आढळल्यास भविष्यात मुलांचाही लसीकरणासाठी विचार केला जाऊ शकतो. मात्र, पुढच्या चरणात १८ वर्षाहून अधिक वयापेक्षा प्रत्येक नागरिकांना ही लस निश्चितपणे दिली जाईल.

गर्भावस्थेत ही लस सुरक्षित आहे?

गर्भावस्थेच्या काळात लसीच्या प्रभावावर संशोधन सुरू आहे. सद्यस्थितीत गर्भवती महिला आणि नवजातकांना स्तनपान करत असलेल्या महिलांना लसीकरणासाठी सांगितले जात नाही. या संदर्भात निश्चित आकडेवारी प्राप्त झाल्यास स्थिती अधिक स्पष्ट होईल.

मला व्हॅक्सिन कधी मिळणार?

प्रत्येकाला लस मिळण्यासाठी साधारणत: एक वर्ष लागेल. ज्यांना जोखिम जास्त आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल. यात आरोग्य कर्मचारी जसे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स, इस्पितळातील सहकारी स्टाफ, सुरक्षा यंत्रणेतील लोक तसे पोलीस, सैनिक यांचा समावेश आहे. सोबतच कॅन्सर, मधुमेह आणि हायपरटेंशनसारख्या आजारांनी पीडित ६५ वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्तींना ही लस प्राथमिकतेच्या तत्त्वावर दिली जाईल. या लोकांना संक्रमणाचा धोका अधिक असल्याने, ते प्राधान्य क्रमात आहेत. जोखिम असलेल्या लोकसंख्येला लसीकरण झाल्यानंतर उर्वरित लोकसंख्येचा क्रम येईल.

लसीकरणानंतर मास्क, फिजिकल डिस्टेन्सिंगची गरज असेल का?

होय. कारण, लसीकरण परिणामकारक झाल्यावरही संक्रमणाचा धोका राहीलच. लस घेतल्यानंतर इम्युनिटी किती काळ राहील, याचा खुलास अजून झालेला नाही. त्यामुळे, लसीकरणानंतरही फिजिकल डिस्टेन्सिंग, मास्क आणि हॅण्डवॉशिंग गरजेची राहील.

ही महामारी कधी संपेल?

हर्ड इम्युनिटी विकसित झाल्यावरच ही महामारी संपेल. लोकसंख्येचा मोठा भाग महामारी विरोधात इम्युन होतो, तेव्हा महामारी संपते. व्हॅक्सिन जेव्हा योग्य मात्रेत उपलब्ध होईल, तेव्हा नागरिकांना सुरक्षित ठेवणे सोपे जाईल. जेवढे जास्त लोक लस घेतील तेवढे जास्त सुरक्षेचे प्रमाण वाढेल.

भारतीय नागरिकांसाठी लस तयार झाली आहे आणि काहीच दिवसात लसीकरणास सुरुवात होईल. ही जगातील सर्वात मोठी मोहीम असेल. त्यामुळे, या मोहिमेत सकारात्मक ऊर्जेने सर्व सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. सोबतच नागरिकांनी साईड इफेक्ट्सच्या बिनबुडाच्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करतो आहोत.

Web Title: Every important person should get the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.