दर महिन्याला ४६ जण कवटाळतात मृत्यूला
By admin | Published: October 4, 2015 03:27 AM2015-10-04T03:27:17+5:302015-10-04T03:27:17+5:30
विविध कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन दर महिन्याला ४६ जण मृत्यूला कवटाळत आहेत. उपराजधानीतील ही धक्कादायक ...
नागपूर : विविध कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन दर महिन्याला ४६ जण मृत्यूला कवटाळत आहेत. उपराजधानीतील ही धक्कादायक आणि चिंताजनक स्थिती आहे. सहा वर्षात २७७३ लोकांनी आत्महत्या केली असून आत्महत्येच्या घटना सतत वाढत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर शहर गुन्हेशाखेकडून ही माहिती प्राप्त केली आहे.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण २७७३ जणांच्या आत्महत्येपैकी पुरुषांची संख्या २०१८ आणि महिलांची संख्या ७५५ आहे. पुरुषांची ही टक्केवारी ६२.५८ आणि महिलांची टक्केवारी ३७.४१ एवढी आहे. चालू वर्षी जुलै २०१५ पर्यंत ३२३ जणांनी आत्महत्या केली आहे. या आकडेवारीवरून दर महिन्याला सरासरी ४६ जण आत्महत्या करीत आहेत. या एकूण आत्महत्येपैकी पंधरा वर्षांखालील मुलांची संख्या ३२ आहे.(प्रतिनिधी)