जिल्ह्यातील प्रत्येक शाळेची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:10 AM2021-02-21T04:10:03+5:302021-02-21T04:10:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, सावनेर, नरखेड, रामटेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, सावनेर, नरखेड, रामटेक तालुक्यातील काही शाळांमधील विद्यार्थी कोरोना संक्रमित झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही बाब गांभीर्याने घेतली असून, येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ३०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, या अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस शाळांना अचानक भेट द्यायची आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणद्वारे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले होते. पूर्वतयारीचे नियोजन योग्य झाले की नाही, त्यासाठी अधिकाऱ्यांकडून शाळांना भेट देण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांचे शाळांना भेट देणे हळुहळू कमी झाले. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसात जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क झाले आहे.
ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संक्रमित झाले, त्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भावाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि एकूणच कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन होतेय की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जवळपास ३०० अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला भेट देऊन आढावा घेणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांना प्रत्येक तहसील कार्यालयात उपस्थित राहायचे आहे. याठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
- याकडे राहणार कटाक्ष
शाळा तपासणीत कोविडसदृश्य लक्षणे असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची आरटीपीसीआर चाचणी झाली का?, शाळेतील स्वच्छता व निर्जंतुकीकरणविषयक सुविधेची निश्चिती, उपलब्ध वर्गखोल्यांमधील बैठकीची व्यवस्था, शारीरिक अंतराचे पालन आदी तपासण्यात येणार आहे. पालक अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनवेळा शाळांची अचानक तपासणी करुन त्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे.