प्रत्येक आठवड्यात ‘मेंटेनन्स’ तरीही विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:56 AM2019-04-16T00:56:44+5:302019-04-16T00:57:33+5:30
महावितरणने ‘हीट अॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? हा प्रश्न निर्माण होतो. मेंटेनन्सच्या नावावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या थट्टेमुळे नागरिकांसोबतच उद्योगांचेही हाल होत आहे. बुटीबोरीसारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील विजेचा लपंडाव हा लहानसहान कारणांमुळे नेहमीचीच बाब झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने ‘हीट अॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? हा प्रश्न निर्माण होतो. मेंटेनन्सच्या नावावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या थट्टेमुळे नागरिकांसोबतच उद्योगांचेही हाल होत आहे. बुटीबोरीसारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील विजेचा लपंडाव हा लहानसहान कारणांमुळे नेहमीचीच बाब झाली आहे.
विशेष म्हणजे महावितरणतर्फे दर बुधवारी मेंटेनन्सच्या नावाखाली अनेक तास वीज बंद ठेवली जाते. प्रत्येक भागात वीज बंद असते. वीज बंद राहणार असल्याचे मॅसेज पाठून ग्राहकांना माहिती दिली जाते. वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. परंतु त्याचा पाहिजे तसा परिणाम होताना दिसून येत नाही. ग्राहकांना २४ तास वीज मिळत नाही आहे. बुटीबोरीचेच उदाहरण घेतले तर ‘ट्रिपिंग’ सामान्य बाब झाली. दिवसा पाच ते दहा मिनिटांसाठी वीज जाणे सामान्य बाब झाली आहे. इतकेच नव्हे तर आठवड्यात सरासरी एक दिवस तासन्तास ‘शटडाऊन‘ हेही ठरलेले आहे. रविवारी रात्रीसुद्धा असेच झाले. अनेक तासासाठी वीज बंद होती. हे सर्व तेव्हा होत आहे, जेव्हा दर आठवड्याला वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी अनेक तासांचे ‘मेंटेनन्स’ होत आहे. नियमानुसार यादरम्यान वीज उपकरणांचे नट आदी टाईट केले जायला हवे. वीज लाईनवर झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडू नये म्हणून फांद्या छाटण्यात येतात. परंतु सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार असे होताना दिसून येत नाही. कर्मचारी केवळ टाइमपास करीत असतात. वीज लाईनच्या आजूबाजूला झाड्यांच्या वेढलेल्या फांद्या याचे संकेतही देतात. याच निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्येक आठवड्यात मेंटेनन्स तरीही विजेचा लपंडाव
उद्योगांनी नोंदविली तक्रार
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने महावितरणकडून रोज होणाऱ्या ‘ट्रिपिंग’(वीज बंद होणे)ची तक्रार केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी सांगितले की, रोज एक किंवा दोनवेळा ट्रिपिंगमुळे उद्योगांना ‘मॅन पॉवर’सह ‘मॅन हॉवर’चेही नुकसान होत आहे. महावितरण दावा करीत आहे की, परिस्थिती सुधारण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. उद्योगांना त्याची प्रतीक्षा आहे.
‘त्रुटी’ शोधण्यास लागले १५ तास
बुटीबोरीमध्ये रविवार-सोमवारच्या दरम्यान रात्री जवळपास २.३० वाजता वीज गेली. महावितरणच्या माहितीनुसार सिडको कॉलनीला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही अंडरग्राऊंड लाईनमध्ये त्रुटी आली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या ठिकाणी अंधार खूप असल्याने नेमकी त्रुटी लक्षात येऊ शकली नाही. त्यामुळे दुसऱ्या फिडरवरून वीज पुरवठा करण्यात आला. सोमवारी दुपारी ३ वाजता त्रुटी कुठे आहे, याचा शोध लागला. यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. सायंकाळी ५ वाजता दुरुस्ती करून फिडरशी पुन्हा जोडण्यात आले.