स्मार्ट सिटीत जागोजागी कचरा : मनपा प्रशासन सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:54 AM2019-10-30T00:54:11+5:302019-10-30T00:55:36+5:30
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दिवाळीचा सण शहरात सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना रस्त्यावर सफाई कर्मचारी शोधूनही सापडत नाही. घरोघरी कचरा उचलणारी यंत्रणा कोलमडल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला वा मोकळ्या जागेत कचरा टाकत आहेत. सक्करदरा तलावाच्या बाजूला कचरा संकलनासाठी ठेवण्यात आलेल्या कुंड्यांच्या बाजूला कचरा पडून आहे. सक्करदरा भागातील छोटा ताजबाग परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. अशीच परिस्थिती सक्करदरा येथील बुधवार बाजाराची आहे. बाजारात साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहे. ताजुद्दीन बाबा उड्डाण पुलाखाली कचला उचलला जात नसल्याने ढिगारे लागले आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून कचरा पडून आहे. महाल येथील राजविलास टॉकीजच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग साचला आहे. बाजूलाच दुकाने आहे. येथे लोकांची वर्दळ असते असे असूनही साफसफाईसाठी कर्मचारी तैनात करण्यात आलेले नाही.
सीताबर्डी उड्डाण पुलाखाली जागोजागी दोन दिवसापासून कचरा साचून आहे.
निवासी भागातील अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु दिवाळीमुळे सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणात सुटीवर असल्याने साफसफाई बंद आहे. यामुळे अजूनही जागोजागी फटाक्यांचा कचरा तसाच पडून आहे. काही वस्त्यात कचरा संकलन करणारी गाडी फिरली परंतु बहुसंख्य वस्त्यात फिरली नाही. यामुळे जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे.