दरवर्षी ४० हजार लोकांना बुबूळामुळे येते अंधत्व : अशोक मदान यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 08:55 PM2019-08-24T20:55:24+5:302019-08-24T20:59:30+5:30

भारतात १२ लाख लोकांना बुबूळाचे अंधत्व आले आहे. दरवर्षी ४० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. यात ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षांच्या आतील आहेत. यावर बुबूळ प्रत्यारोपण हाच एकउपचार आहे.

Every year, 40,000 people suffer from eyeball Blindness: Information by Ashok Madan | दरवर्षी ४० हजार लोकांना बुबूळामुळे येते अंधत्व : अशोक मदान यांची माहिती

दरवर्षी ४० हजार लोकांना बुबूळामुळे येते अंधत्व : अशोक मदान यांची माहिती

Next
ठळक मुद्देसोमवारपासून नेत्रदान पंधरवाडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबूळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. भारतात १२ लाख लोकांना बुबूळाचे अंधत्व आले आहे. दरवर्षी ४० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. यात ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षांच्या आतील आहेत. यावर बुबूळ प्रत्यारोपण हाच एकउपचार आहे. नागपुरातील एकट्या मेडिकल रुग्णालयात दरवर्षी असे ६०वर नवे रुग्ण आढळून येतात, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी येथे दिली.
नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्यावतीने २६ ऑगस्टपासून पंधरवाडा पाळला जात आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मदान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अंधत्व हे केवळ मोतीबिंदुमुळेच येते असे नाही, तर डोळयांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. पारदर्शक पटल अपारदर्शक होणे हा आजार कोणत्याही वयाच्या म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. अलिकडे मधुमेह, काचबिंदू, वाढते वय आणि बुबूळ खराब होऊन येणाऱ्याअंधत्वाचे प्रमाण वाढले आहे. यावर बुबूळ प्रत्यारोपण हा उपचार असलातरी, आवश्यक त्या प्रमाणात नेत्रदान होणे आवश्यक आहे, असेही डॉ. मदान म्हणाले. पत्रपरिषदेत डॉ. कविता धाबर्डे, डॉ. राजेश जोशी, डॉ. मिनल व्यवहारे व डॉ. स्नेहल बोंडे उपस्थित होत्या.
देशात वर्षाला केवळ २८ हजार बुबूळ प्रत्यारोपण
जगात ४५ दशलक्ष लोक अंध आहेत. भारतात याचे प्रमाण १७ दशलक्ष आहे. भारतात बुबूळामुळे आलेल्या अंधत्वाची संख्या १.२ दशलक्ष आहे. यातील बहुसंख्य रुग्णांवर बुबूळाचे प्रत्यारोपण करून अंधत्व दूर करता येऊ शकते. परंतु नेत्रदानाबाबतच्या उदासिनतेमुळे लोकांना आयुष्यभर अंधत्वात जीवन जगावे लागते. धक्कादायक म्हणजे, भारतात हजार लोकसंख्येत ७.३ टक्के लोकांचा मृत्यू होतो. परंतु दरवर्षी केवळ ५२ हजारच नेत्रदान होते. यातही विविध कारणांमुळे केवळ २८ हजार बुबूळ प्रत्यारोपण होते, अशी खंतही डॉ. मदान यांनी बोलून दाखवली.
मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत १४० बुबूळ मिळाले. यात मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांकडून ८१ तर इतर नेत्र पेढीकडून ५९ बुबूळ मिळाले. परंतु सर्वच बुबूळ प्रत्यारोपणासाठी योग्य राहत नसल्याने ६५ रुग्णांवर बुबूळ प्रत्यारोपण करून नवी दृष्टी देण्यात आल्याचे डॉ. मदान यांनी सांगितले.
मृत्यूनंतर नातेवाईकांना नेत्रदानाची माहिती देणे गरजेचे
डॉ. मदान म्हणाले, मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये दरदिवशी पाच ते सात रुग्णांचा विविध कारणांमुळे मृत्यू होतो. रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्र तयार करताना त्या फॉर्मवर नातेवाईकांना नेत्रदानाला संमती आहे किंवा नाही ते भरावे लागते. परंतु बहुसंख्य डॉक्टर त्याकडे दुर्लक्ष करतात. नातेवाईकांचे समुपदेशन केले जात नाही. नेत्रदान कमी होण्यासाठी हेही एक महत्त्वाचे कारण आहे.
‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ वाढविणे गरजेचे
एकीकडे नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक असताना बुबूळाच्या प्रत्येक स्तराचा वापर अंधत्व दूर करण्यास व्हायला हवा. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ म्हटले जाते. बुबूळावर पाच स्तर असतात. यातील वरील दोन स्तर खराब झालेले असलेतरी उर्वरित दोन-तीन स्तराचा उपयोग अंधत्व दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. मेडिकलमध्ये गेल्या वर्षी १६ रुग्णांवर ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ करण्यात आली. परंतु यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची गरज आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण बुबूळ प्रत्यारोपणाच्या तुलनेत ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ शस्त्रक्रियेचा यशाचा दर दुप्पट आहे, असेही डॉ. मदान म्हणाले.
चून्यामुळे वाढते अंधत्व
तंबाखू खातांना त्यात मिसळविणाऱ्या चून्यामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांची संख्या एकट्या मेडिकलमध्ये वर्षाला १२ च्यावर आहे. ‘अ‍ॅसीड’पेक्षाही चूना डोळ्यासाठी धोकादायक ठरतो.

  • नेत्रदानासाठी हे गरजेचे
  • नेत्रदानाविषयी व्यापक जनजागृती
  • नेत्रपेढी व नेत्र प्रत्यारोपण करणाऱ्यांमध्ये समन्वय असणे
  • एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बुबूळ उपलब्ध करून देण्याची सोय
  •  कॉर्निआ शल्यचिकित्सकांची पदभरती
  •  त्यांना लॅमीलर केरॅटोप्लास्टी’चे प्रशिक्षण देऊन शस्त्रक्रियेचे लक्ष्य देणे
  • बुबूळाची गरज असलेल्या रुग्णांची बायोमॅट्रिक करणे
  • पंचनाम्यापूर्वी बुबूळ काढण्यास परवानगी मिळणे
  • नेत्रदानात प्राप्त झालेले बुबूय यांचे योग्य वितरण होणे

Web Title: Every year, 40,000 people suffer from eyeball Blindness: Information by Ashok Madan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.