दरवर्षी ६० लाख लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू
By Admin | Published: May 30, 2016 02:13 AM2016-05-30T02:13:44+5:302016-05-30T02:13:44+5:30
जगभरात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्युमुखी पडतात.
सुशील मानधनिया : २०३० पर्यंत हा आकडा तिपटीने वाढण्याची भीती
नागपूर : जगभरात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्युमुखी पडतात. युरोपीय देशांमध्ये सिगारेटमुळे दगावणाऱ्यांची संख्या ही टीबी, हृदयरोगापेक्षाही मोठी आहे. भारताचा विचार करायचा तर देशात दरवर्षी ७ लाख लोक तंबाखूमुळे दगावतात. आपल्याकडे तंबाखूमुळे घसा, फुफ्फुस, अन्ननलिका, मुखाच्या कर्करोगामुळे दगावणाऱ्यांची संख्या अन्य कर्करोगाने दगावणाऱ्यांच्या तुलनेत ८० पटीने अधिक आहे. तंबाखूमुळे ५ लाख ५० हजार पुरुष अकाली प्राण गमावतात. या तुलनेत महिलांची संख्या ही १ लाख १० हजार आहे, अशी माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी येथे दिली.
३१ मे हा दिवस जगभर तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
डॉ. मानधनिया म्हणाले, धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात राहणारे १ लाख नागरिक देखील आयुष्यात कधीही व्यसन न केल्याने दगावतात. हृदयरोग, टीबीच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी पटीने अधिक आहे. सरासरीने विचार केला तर देशात अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ५० टक्के हे कर्करोगाचे बळी आहेत. टीबीचा यातला वाटा ३० टक्के आहे. २०३० पर्यंत हा आकडा तिपटीने वाढण्याची भीती आहे.(प्रतिनिधी)
कर्करोगावरील उपचारावर खर्च होतो
१६ हजार ८०० कोटी
देशात दरवर्षी तंबाखूमुळे १ लाख ४ हजार कोटी रुपये खर्च होतात. त्यापैकी १६ हजार ८०० कोटी रुपये हे केवळ त्यामुळे होणाऱ्या कर्करोगावरच्या उपचारावर खर्च होतात. यातून होणारी आर्थिक हानी लक्ष वेधणारी आहे. सरासरी लोकसंख्येचा विचार केला तर देशातील २७ कोटी ५० लाख जनता तंबाखूचे सेवन करते तर १६ कोटी ५० लाख लोक हे सिगारेट, बिडी ओढतात. दोन्ही व्यसने असणाऱ्यांचे प्रमाण हे साडेसात कोटी आहे. त्यामुळे सामान्यपणे दगावणाऱ्यांपेक्षा कर्करोगाची जोखीम ही ६० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे हृदयरोग, कर्करोग, श्वसनाचे विकारांनी दगावणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.