युवकाचे प्राण वाचविणाऱ्या मानेंचे सर्वत्र कौतुक
By admin | Published: September 18, 2016 02:53 AM2016-09-18T02:53:37+5:302016-09-18T02:53:37+5:30
थेट मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या एका युवकाला सहीसलामत बाहेर काढणारे धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस आयुक्तांनी दिले प्रशस्तीपत्र : रिवॉर्डही जाहीर
नागपूर : थेट मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या एका युवकाला सहीसलामत बाहेर काढणारे धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनीही माने यांचे कौतुक करून प्रशस्तीपत्र तसेच साडेसात हजारांचा रिवॉर्ड जाहीर केला.
सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू शुक्रवारी नागपुरात आली होती. हिलटॉपवरील एकता गणेश मंडळाच्या पेंडॉलमध्ये पोहचलेल्या आर्चीची एक झलक बघण्यासाठी तिच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. कुणी इमारतीवर, कुणी बालकनीत कुणी भिंतीवर तर कुणी विविध वाहनांच्या टपावर चढले होते. काही जण बाजूच्या कुंपण भिंतीवर उभे होते. त्यातील अक्षय विठ्ठलराव वैद्य (रा. डागा लेआऊट अंबाझरी) या युवकाचा बाजूलाच असलेल्या डीपीला (ट्रान्सफार्मर) स्पर्श झाला. तो ट्रान्सफार्मरलाच चिकटल्याचे लक्षात आल्याने बाजूची मंडळी पळाली. एका व्यक्तीने इमारतीवरून पोलिसांना मुलाला करंट लागल्याचा इशारा केला. ठाणेदार माने यांचे लक्ष जाताच त्यांनी तात्काळ एका पोलिसाची काठी हातात घेऊन अक्षयला ट्रान्सफार्मर पासून वेगळे केले. त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी बाजूच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्याची प्रकृती चांगली आहे. त्याचा जीव मानेंच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे बचावल्याचे कळताच मानेंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाऊ लागले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी स्वत: फोन करून मानेंचे कौतुक केले. लगेच त्यांना साडेसात हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर करण्यात आला. प्रशस्तीपत्रकही पाठवले. माने यांचे अभिनंदन करीत अवघ्या पोलीस दलाने त्यांना ‘सॅल्यूट‘ केला. (प्रतिनिधी)