अन् अख्खे रनाळा गाव हळहळले!

By Admin | Published: January 25, 2017 02:54 AM2017-01-25T02:54:05+5:302017-01-25T02:54:05+5:30

यवतमाळ - आर्णी मार्गावरील जेतवन बुद्धविहाराजवळ (जिल्हा यवतमाळ) सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात

Everyday Ranala village is unhappy! | अन् अख्खे रनाळा गाव हळहळले!

अन् अख्खे रनाळा गाव हळहळले!

googlenewsNext

तिघांवर सामूहिक अंत्यसंस्कार : एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
कामठी : यवतमाळ - आर्णी मार्गावरील जेतवन बुद्धविहाराजवळ (जिल्हा यवतमाळ) सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात कामठी तालुक्यातील रनाळा येथील तिघे व नेरी येथील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रनाळा येथील तिघांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात सामूहिक अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अख्खे गाव स्तब्ध होते. सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
शांताराम माधवराव नवले (४५), लताबाई शांताराम नवले (४०), सरस्वती सूर्यभान नवले (५५) तिघेही रा. रनाळा, ता. कामठी व नेरी येथील अमित शेषराव वंजारी (२५) अशी मृतांची नावे आहेत. यांच्यासह नागपूरचे तिघेजण एमएच-४०/केआर-२४२२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने रनाळ्याहून उमरखेड तालुक्यात जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यात सातही जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रनाळा येथील काही नागरिकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत सर्व जखमींसह मृतांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता उत्तरीय तपासणी तत्काळ करण्यात आली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारात मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. तिघांचेही मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रनाळा येथे आणण्यात आले. मृतदेहाच्या प्रतीक्षेत प्रत्येकाने रात्र जागून काढली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. प्रत्येक मन हळहळत होते. गावातील प्रत्येक व्यक्ती गावातच हजर होती. या घटनेमुळे नवले कुटुंबीयांवर संकटाचा जणू डोंगर कोसळला.
अंत्ययात्रेत माजी आ. देवराव रडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सदस्या सरिता रंगारी, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र गवते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, उपसभापती प्रमोद महल्ले, अनिल निधान, भिलगावचे सरपंच मोहन माकडे, येरखेड्याचे सरपंच मनीष कारेमोरे यांच्यासह लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

शांतारामची सामाजिक बांधिलकी
रनाळा येथे स्मशानभूमीचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त स्मशानभूमीत दहनशेड तयार करण्यासाठी शांताराम नवले यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी अनेक दिवस संघर्षही केला. त्यांच्याच पुढाकाराने या स्मशानभूमीत शेड तयार करण्यात आले. याच शेडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत रनाळावासीयांना अखेरचा निरोप द्यावा लागतो. थरथरत्या हातांनी त्यांचे सरण रचण्यात आले. त्यांच्यापूर्वी या गावातील यमुनाबाई डहाके यांच्या पार्थिवावर या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ते चांगल्या तऱ्हेने सरण रचायचे. गावातील बहुतांश अंत्यसंस्काराचे सरण त्यांनी रचत एक वेगळी सामाजिक बांधिलकी जोपासली होती.

मुलांचे छत्र हरपले
शांताराम नवले यांना तीन मुले आहेत. मोठा शुभम (२१) हा पांजरा (कोराडी) येथील महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षाला आहे. मधला सौरभ (१९) हा कामठी येथे पॉलिटेक्निक करीत असून, लहान कुणाल (१६) हा कामठीतील नूतन सरस्वती विद्यालयात १० व्या वर्गात शिकत आहे. काळाने अपघातात या तिघांचेही आई-वडील हिरावून घेतल्याने त्यांचे छत्र हरपले.

भजनाच्या व्यासंगी सरस्वतीबाई
या आपघातात सरस्वतीबाई सूर्यभान नवले यांचाही मृत्यू झाला. त्या भजनाच्या व्यासंगी होत्या. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात महिला भजन मंडळाची स्थापना केली. गावातील अनेक महिलांना या भजन मंडळात सामावून घेतले होते. त्यांना तीन विवाहित मुली व एक मुलगा आहे. सूर्यभान नवले हे शांताराम यांचे मोठे बंधू होत. त्यांनी रनाळ्याचे सरपंचपदही भूषविले. शांताराम यांना चार भाऊ असून, ते धाकटे होत. सीताराम हे त्यांचा दुसऱ्या व गजानन तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ होय. सीताराम हे महावितरणमध्ये तर गजानन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते.

Web Title: Everyday Ranala village is unhappy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.