राजकारणात सर्वजण अस्वस्थ

By Admin | Published: April 11, 2016 03:04 AM2016-04-11T03:04:40+5:302016-04-11T03:04:40+5:30

अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे राजकारणात सर्वजण अस्वस्थ राहतात, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी...

Everyone is restless in politics | राजकारणात सर्वजण अस्वस्थ

राजकारणात सर्वजण अस्वस्थ

googlenewsNext

नितीन गडकरींचा नेम : न्यायदानातील विलंबावर खंत
नागपूर : अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे राजकारणात सर्वजण अस्वस्थ राहतात, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर साधला. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित ‘जस्टिसिया’ परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
ही तीन दिवसीय परिषद डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडली. कार्यक्रमात गडकरी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
राजकारणात कोणीही समाधान मानायला तयार नाही. यामुळे अस्वस्थता सतत वाढत आहे. नगरसेवक आमदारासाठी तिकीट मिळाली नाही म्हणून, आमदार मंत्रिपद मिळाले नाही म्हणून, मंत्री चांगले खाते मिळाले नाही म्हणून तर, चांगले खाते मिळणारे मुख्यमंत्री झालो नाही म्हणून अस्वस्थ होतात, असे गडकरी म्हणाले. याशिवाय गडकरी यांनी न्यायदानात होत असलेल्या विलंबावर खंत व्यक्त केली. न्यायव्यवस्थेवर आजही लोकांचा विश्वास आहे. न्यायव्यवस्था बदलत आहे. पारदर्शकता वाढत आहे. परंतु पक्षकारांना वेगात न्याय मिळाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नागपुरातील वकिली क्षेत्राला श्रीमंत परंपरा लाभली आहे. येथे कोणीही जात व धर्माच्या नावावर भेदभाव करीत नाही. नवोदित वकील चुकत असल्यास तो कोणत्याही जातीधर्मातील असो ज्येष्ठ वकील त्याला कान धरून योग्य मार्गावर आणतात, असे सिरपूरकर यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी स्पर्धा अपिलीय न्यायाधिकरणात नागपुरातील एकही वकील व्यवसाय करीत नसल्यामुळे खंत व्यक्त केली. नागपुरातील वकिलांनी आता दिवाणी, औद्योगिक व फौजदारी प्रकरणाच्या बाहेर पडून स्वत:च्या कक्षा विस्तारण्याची वेळ आली आहे. हा काळ ‘कॉर्पोरेट प्रॅक्टिस’चा आहे, असे मत व्यक्त करून यासाठी वकिलांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची तयारी सिरपूरकर यांनी दर्शविली.
न्या. गवई यांनी ही परिषद एक ज्ञानयज्ञ होती असे मत व्यक्त केले तर, न्या. धर्माधिकारी यांनी खरी वकिली न्यायालयातच शिकता येते, असे सांगितले. व्यासपीठावर परिषदेचे संयोजक अ‍ॅड. उदय डबले, संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल व सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे उपस्थित होते.याप्रसंगी नवनियुक्त प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: Everyone is restless in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.