प्रत्येकाने कर्तव्याची जाणीव ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:01 AM2017-10-03T00:01:15+5:302017-10-03T00:01:43+5:30
आज देश, समाज यासंदर्भात जाणीव राहिलेली नाही. ही जबाबदारी केवळ शासनाची आहे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज देश, समाज यासंदर्भात जाणीव राहिलेली नाही. ही जबाबदारी केवळ शासनाची आहे, असे सांगून देशाप्रति, समाजाप्रति आपली जबाबदारी टाळली जात आहे. नागरिकांनी जबाबदारी टाळल्यामुळे त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहे. चांगली शासन व्यवस्था टिकविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्याचा बोध घेणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.
सोमवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव साजरा झाला. या सोहळ्यात सेविकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आयएमएच्या माजी अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे उपस्थित होत्या. तर रा.से.स.च्या नागपूर विभाग कार्यवाहिका करुणा साठे, प्रमख कार्यवाहिका सीता अन्नदानम, विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले उपस्थित होत्या. त्याचबरोबर अ.भा. शारीरिक प्रमुख मनीषा संत, माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेढे, महापौर नंदा जिचकार, पश्चिम क्षेत्र प्रांत प्रमुख रत्नाताई हसेगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम हरकरे यांनीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. राष्ट्रसेविका समितीला ८१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ८१ सेविकांद्वारे घोषवादन व प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यापूर्वी शस्त्रपूजन व ध्वजारोहण झाले. यावेळी शांताक्का म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. आपल्यात मनुष्यत्व आहे का? हा विचार करणे गरजेचे आहे. देशाची परंपरा व धर्माला आपण विसरत चाललो आहे. अधर्माचा विरोध करताना आपली पावले मागे पडत आहे. विजयादशमीचा उत्सव आपल्याला धर्म व संस्कृतीचे रक्षण करण्याचे शिकवितो. राक्षसी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी दैवी शक्ती जागृत करणे गरजेचे झाले आहे.
त्या म्हणाल्या की, देशाला अखंड ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. जम्मू-काश्मिरात राष्ट्रीय मुस्लीम महिला मंचचे उदाहरण देत, या मंचच्या महिला सदस्य घरोघरी जाऊन लोकांमध्ये जागृती आणत आहे. त्याचा परिणाम जम्मूमध्ये दिसून आला आहे. आपण केवळ शासनाची जबाबदारी असे सांगून आपल्या कर्तव्याकडे पाठ फेरतो. लव्ह जिहाद या विषयावर बोलताना त्यांनी केरळ राज्यातील उदाहरण देत उच्चशिक्षित तरुणी यात फसत चालल्या आहेत. याचे मुख्य कारण संस्कार आणि ज्येष्ठांचा आदर हरवीत चालला आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी डॉ. ढवळे यांनी महिलांना स्वत:ची क्षमता ओळखण्याचा सल्ला दिला. त्यांनी कन्या भ्रूणहत्या ही सामाजिक वेदना असल्याचे सांगत त्याला महिला आणि पुरुष दोघेही जबाबदार असल्याचे म्हणाल्या. मुलींना आत्मविश्वास व आरोग्य जोपासण्याचा त्यांनी सल्ला दिला.
चिनी वस्तूंचा बहिष्कार करा
जी गोष्ट राष्ट्रासाठी घातक आहे, त्यापासून आपण दूर राहणे गरजेचे आहे. चीनच्या वस्तू खरेदी करून आपण देशाला हानी पोहोचवीत आहोत. दिवाळीला मोठ्या संख्येने चीनच्या वस्तू बाजारात येतात. त्यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाºया आंदोलनावरही त्यांनी टीका केली. देशात गरिबी असताना आंदोलनाच्या नावाने आपण लाखो लिटर दूध रस्त्यावर फेकतो. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो. हे नुकसान राष्ट्राबरोबरच स्वत:चेसुद्धा असल्याचे शांताक्का म्हणाल्या.