प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा
By दयानंद पाईकराव | Published: June 5, 2024 03:58 PM2024-06-05T15:58:39+5:302024-06-05T16:00:26+5:30
प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आवाहन : जपानी गार्डनमध्ये जागतिक पर्यावरण दिन
दयानंद पाईकराव/नागपूर
नागपूर : जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल, वाढते वाळवंटीकरण या समस्या गंभीर होत चालल्या असून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने सेमिनरी हिल्स येथील जपानी गार्डनमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) श्रीनिवास राव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) पी. कल्याणकुमार, वनसंरक्षक श्री लक्ष्मी, उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा यांची प्रमुख उपस्थिती होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमांतर्गत १९७३ पासून १५० पेक्षा अधिक देशात जागतिक पर्यावरण दिन ५ जूनला साजरा करण्यात येतो.
यानिमित्त वनविभागाच्या वतीने पर्यावरणाशी संबंधीत संस्था, इतर विभागाच्या सहकार्याने क्षेत्रीय व जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर वनविभाग, मानद वन्यजीव रक्षक तसेच पर्यावरणाशी संबंधीत काम करणाºया अशासकीय संस्थांचे सहकार्य लाभले.