अवयवदानाचे मोल प्रत्येकाने ओळखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:49+5:302021-08-17T04:12:49+5:30

- तज्ज्ञांचा सूर : अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज सुमेध वाघमारे नागपूर : अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, ...

Everyone should know the value of organ donation | अवयवदानाचे मोल प्रत्येकाने ओळखावे

अवयवदानाचे मोल प्रत्येकाने ओळखावे

Next

- तज्ज्ञांचा सूर : अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज

सुमेध वाघमारे

नागपूर : अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, थांबलेले जगणे सुरू होऊ शकते. एक मृतदेह ११ जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. परंतु योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी लढा देत आहेत. यामुळे वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणणे गरजेचे आहे, असे मत शहरातील विविध अवयवांचे प्रत्यारोपण तज्ज्ञ व डॉक्टरांनी मांडले.

अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता, ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’, अशी नवी म्हण पुढे येत आहे. उपराजधानीतील गेल्या सात वर्षांत टप्प्याटप्प्याने अवयवदानाचा आकडा वाढत आहे. परंतु अवयवदानाचे प्रमाण आजही अपेक्षेपेक्षा कमी आहे. यामागे राहण्याची नेमकी कारणे कोणती? आजही समाजात याबाबत गैरसमज आहेत का? अवयवदानाच्या जनजागृतीकरिता शासन कमी पडते का? अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याकरिता काय करणे गरजेचे आहे? श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे का? अशा अनेक प्रश्नांवर डॉक्टरांनी चर्चा केली.

- ०.५ टक्केही अवयवदान होत नाही - डॉ. देवतळे ()

‘आयएमए’ अध्यक्ष डॉ. संजय देवतळे म्हणाले, लोकसंख्येच्या तुलनेत भारतात ०.५ टक्केही अवयवदान होत नाही. भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. कदाचित याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद जनसामान्यातून मिळत नाही. नागपुरात ‘एम्स’, दोन वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय व ७०० वर छोटी व मोठी रुग्णालये आहेत. यामुळे उपराजधानीचे हे शहर ‘मेडिकल हब’ सोबतच ‘ऑर्गन डोनेशन सिटी’ म्हणून ओळख व्हावी, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.

- यकृताच्या प्रत्यारोपणासाठी ‘लिव्हिंग डोनर’ गरजेचे - डॉ. सक्सेना ()

यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना म्हणाले, मधुमेह, रक्तदाब व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती ‘लिव्हर सिरोसिस’ या आजाराने बाधित आहे. परिणामी, भारतात ‘लिव्हर कॅन्सर’ मृत्यूचे पाचवे कारण ठरले आहे. यकृत हे जिवंतपणी (लिव्हिंग डोनर) व मेंदूमृत व्यक्तीकडून (कॅडेव्हेरिक डोनर) घेता येते. ‘लिव्हिंग डोनर’मध्ये यकृताच्या उजव्या भागातील ५० ते ६० टक्केच भाग घेतला जातो. दात्याचे यकृत सात ते आठ आठवड्यात पुन्हा ‘रिजनरेट’ होते. तर मेंदूमृत व्यक्तीकडून पूर्ण यकृत घेतले जाते. वाढते रुग्ण पाहता ‘लिव्हिंग डोनर’ वाढणे गरजेचे आहे.

- त्वचादानाबाबत फारशी जागृती नाही - डॉ. जहागीरदार ()

प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार म्हणाले, त्वचा प्रत्यारोपणातून (होमोग्राफ्टिंग) गंभीर स्वरूपाच्या जळीत रुग्णांना वाचविणे शक्य आहे. परंतु, समाजात त्वचादानाबाबत फारशी जागृती नाही. त्यातुलनेत मेंदूपेशी मृत रुग्णांचे अवयवदान वाढले आहे. अन्य अवयवाप्रमाणे त्वचादानाबाबतीत मृताचे नातेवाईक फारसे तयार नसतात. काही गैरसमज असल्याने ते त्वचादानासाठी पुढाकार घेत नाहीत. विशेष म्हणजे, त्वचादानामुळे विद्रुपपणा येत नाही. त्वचेच्या वरचे केवळ दोनच स्तर काढले जातात. नागपुरात आतापर्यंत केवळ ४५ मृताकडून त्वचा दान झाले आहे. त्वचादानाबाबत जनजागृती वाढविणे गरजेचे आहे.

- मूत्रपिंड दानाचे महत्त्व ओळखावे - डॉ. साल्पेकर ()

मूत्रपिंड रोग तज्ज्ञ डॉ. सुहास साल्पेकर म्हणाले, जगात दरवर्षी मूत्रपिंडाचे (किडनी) १५ लाखांवर नवे रुग्ण आढळून येतात. भारतात याचे प्रमाण दोन ते तीन लाख आहे. नागपूरचा जर विचार केला तर दिवसभरात एक नवा रुग्ण आढळून येतो. मधुमेहामुळे १०० मधून ३३ रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार होतो. मागील काही वर्षांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, इतर अवयवांच्या तुलनेत मूत्रपिंडाची मागणी मोठी आहे. सध्याच्या स्थितीत भारतात अडीच लाख रुग्णांना मूत्रपिंडाची गरज आहे. ‘लिव्हिंग डोनर’ व ‘कॅडेव्हेरिक डोनर’ या दोन्हीकडून मूत्रपिंड मिळू शकते. परंतु जिथे नातेवाईक तयार नसतात किंवा टिश्यू जुळत नाही तिथे रुग्ण अडचणीत येतो. त्याला ब्रेन डेड’ रुग्णाची गरज भासते. परंतु प्रतीक्षेची यादी मोठी असल्याने रुग्णाला महिनोनमहिने वाट पाहण्याची जीवघेणी वेळ येत आहे. हे थांबविण्यासाठी अवयवदानाला महत्त्व देणे आवश्यक आहे.

- अंधत्व दूर करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक - डॉ. अळसी ()

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी अळसी म्हणाल्या, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे. यामुळे अनेक लोकांचे अंधत्व दूर करणे शक्य आहे. भारतात अंधश्रद्धा, गैरसमज व इच्छा असतानाही नेत्रदानाची माहिती नसल्याने नेत्रदानाला गती आलेली नाही. जगात ४ कोटी ५० लाख लोक अंध आहेत. यामध्ये १ कोटी ५० लाख रुग्ण एकट्या भारतात आहेत. यातील ६० लाख रुग्णांना बुबुळाचे अंधत्व आहे. यात दरवर्षी ३० हजार रुग्णांची भर पडते. यामुळे अंधत्वाचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढत आहे. सरकारने यात लक्ष घालून कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.

- अवयवदानासाठी जनसामान्यांनीच पुढे यावे - डॉ. खंडाईत ()

आयएमएच्या माजी अध्यक्ष व अवयवदानासाठी पुढाकार घेतलेल्या डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, ज्या संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्यामागे सरकारी यंत्रणेचा कमी पुढाकार हे मुख्य कारण आहे. यामुळे जनसामान्यांनीच पुढे यावे, घरातील मृत माणसाचे अवयव दान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Everyone should know the value of organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.