सर्वांनाच मिळणार अकरावीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:44+5:302021-07-23T04:06:44+5:30

नागपूर : दहावीचा निकाल लागला अन् विद्यार्थ्यासह पालकांना अकरावीच्या प्रवेशाचे वेध लागले. यंदा सरकारने अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय ...

Everyone will get eleventh admission | सर्वांनाच मिळणार अकरावीत प्रवेश

सर्वांनाच मिळणार अकरावीत प्रवेश

Next

नागपूर : दहावीचा निकाल लागला अन् विद्यार्थ्यासह पालकांना अकरावीच्या प्रवेशाचे वेध लागले. यंदा सरकारने अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही परीक्षा ऐच्छिक ठेवली आहे. तसे जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि उपलब्ध असलेल्या अकरावीच्या जागा लक्षात घेता, प्रवेश सर्वांनाच मिळणार आहे. पण नामांकित महाविद्यालयांना सीईटीमुळे प्रवेश देणे सोपी होणार आहे.

सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्रथम स्थान मिळणार आहे. परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येईल. त्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेची वाट न बघता, मोठ्या संख्येने विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंंदणी करीत आहे. पण सीईटीच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने सुरू केलेली वेबसाईट तांत्रिक कारणाने बंद पडली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहे. राज्य शिक्षण मंडळ या परीक्षेचे आयोजन करणार असून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत परीक्षा होणार आहे.

- परीक्षेबाबत महत्वाचे मुद्दे

१) परीक्षा दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न

२) १०० गुणांची प्रश्नपत्रिका राहणार (इंग्रजी -२५, गणित-२५, विज्ञान व तंत्रज्ञान-२५, सामाजिक शास्त्रे - २५ )

३) दहावीच्या ७५ टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षेत असणार प्रश्न

४) परीक्षा ऑफलाईन राहणार असून, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे राहील.

५) सेमी इंग्रजीची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयावरील प्रश्न इंग्रजीत राहणार व सामाजिक शास्त्र विषयातील प्रश्न त्यांनी निवड केलेल्या भाषेत राहणार.

६) राज्य शिक्षण मंडळाच्या २०२०-२१ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क लागणार नाही. मात्र इतर बोर्डाच्या व सत्र २०२०-२१ पूर्वीच्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.

७) परीक्षा केंद्रासंदर्भात विद्यार्थ्यांनी नमूद केलेला तालुका व शहरी भाग विचारात घेतला जाईल.

- दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात दहावी पास विद्यार्थी - ६२२००

शहरातील अकरावीसाठी एकूण जागा - ७३५५५

कला शाखा - १२६६०

वाणिज्य शाखा - २०३०५

विज्ञान शाखा - ३५४६०

एमसीव्हीसी - ५१३०

- सीईटीची वेबसाईट लवकरच होणार सुरू

महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने अकरावीच्या सीईटी परीक्षेसंदर्भात नोंदणी करण्यासाठी २० जुलैपासून वेबसाईट सुरू केली. परंतु तांत्रिक कारणांमुळे वेबसाईट गेल्या दोन दिवसांपासून हॅँग झाली आहे. वेबसाईट दुरुस्त करण्यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे काम सुरू आहे. लवकरच ही वेबसाईट सुरू होईल, तसे विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल.

माधुरी सावरकर, विभागीय सचिव, नागपूर बोर्ड

- मुलांनी पुन्हा एकदा उजळणी करावी

विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारी करताना पुस्तकांचे धडे वाचावे. धड्यांमधील बहुपर्यायी प्रश्न निवडावे. सूत्र, नियम याकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेची तयारी केलीच आहे. पुन्हा एकदा त्याची उजळणी करावी.

दीप्ती बिस्ट, विज्ञान शिक्षिका

Web Title: Everyone will get eleventh admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.