ईव्हीएम हटाव, देश बचाव; निवडणुका ‘बॅलेट पेपर’नेच घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:06 AM2019-08-10T10:06:55+5:302019-08-10T10:07:40+5:30
लोकशाही वाचली तरच देश वाचेल, त्यामुळे ईव्हीएम हटाव, देश बचाव, असा नारा देत नागपुरात नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईव्हीएम मशीनवर आता कुणाचाच विश्वास राहिला नाही. आपली मते चोरली जात असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही वाचली तरच देश वाचेल, त्यामुळे ईव्हीएम हटाव, देश बचाव, असा नारा देत नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला.
इंडिया अगेंस्ट ईव्हीएम ( ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन) च्या बॅनरअंतर्गत हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, पुरोगामी, आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचा समावेश होता. ईव्हीएम हटवण्यात यावे आणि यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरनेच घेण्यात याव्यात, अशी एकमेव मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठीच्या आंदोलनाची ही एक सुरुवात असून ती पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनीही आपापले विचार व्यक्त केले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढण्यात आला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेसतर्फे किशोर गजभिये, नरेंद्र जिचकार, अॅड. नंदा पराते, ईश्वर बरडे, घनश्याम मांगे, नितीन कुंभलकर, तक्षशीला वाघधरे, जय जवान जय किसानचे प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. प्रकाश गजभिये, जावेद हबीब, महेंद्र भांगे, बामसेफतर्फे वाहने, भीम पँथरतर्फे मंडके, रिपाइंचे घनश्याम फुसे, मनोज संसारे, हरिदास टेंभुणे, संजय पाटील, समता सैनिक दलातर्फे राजेश लांजेवार, आनंद तेलंग, सुनील जवादे, आनंद पिल्लेवान, अनिल भांगे, राजरतन कुंभारे, बुद्ध विहार समन्वय समितीचे अशोक सरस्वती, ज्येष्ठ नाटककार संजय जीवने, वंदना जवने, सांची जीवने, नीलेश बागडे, निखील कांबळे, प्रफुल्ल मेश्राम, उज्ज्वल बागडे, सुखदास बागडे, प्रदीप गणवीर, वंचित आघाडीचे रोशन बेहरे, विशाल गोंडाणे आदींसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रास्ताविक समता सैनिक दलाच्या अॅड. स्मिता कांबळे यांनी केले. रिपाइंचे घनश्याम फुसे यांनी आभार मानले.