ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 09:03 PM2019-08-26T21:03:52+5:302019-08-26T21:04:31+5:30
ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर होणारे प्रात्यक्षिक केवळ देखावा असतो, असा आरोप इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमअंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय जनआंदोलनाच्या आयोजकांनी सोमवारी नागपुरात केला.
प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार राजू तिमांडे, फिरोज मिठीबोरवाला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे, ज्योती बढेकर आदी उपस्थित होते.
फिरोज मिठीबोरवाला म्हणाले, ईव्हीएम हा देशात फॅसिस्ट राजवट आणण्याचा मार्ग आहे. राजसत्ता व कॉर्पोरेट शक्तींनी निवडणूक आयोगाला बाहुले बनविले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तक्रारी होऊनही कसलीही दखल घेतली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅटला विचारातच घेतलेले नाही, तरीही सरकार हा देखावा का करीत आहे. २० लाख ईव्हीएम मशीन्स गायब आहेत, हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखविणाऱ्यांना कारागृहात टाकले जाते, या दडपशाहीचे उत्तर सरकारने द्यावे.
ईव्हीएमविरोधात तक्रारी असणाऱ्यांना तसेच सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोागने पाचारण केले असता आपण का गेला नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले, आयोग मशीनला हातही लावू देत नाही. त्यामुळे तिथे जाण्यात अर्थ नव्हता. आमची याचिका न्यायालयात दाखल आहे. न्यायालयानेच यावर निर्णय द्यावा.
प्रशांत पवार म्हणाले, कुणालाही मतदान केले तरी त्यांनाच जातात. कुणाचाही ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या अभियानातून जनजागृती केली जात आहे. १४ सप्टेंबरला देशात ईव्हीएमविरोधात सर्वपक्षीय उठाव आहे. त्याआधीच सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा जनउद्रेक वाढू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. अन्य नेत्यांनीही यावेळी हीच मागणी केली.
ईव्हीएम हॅक करून दाखविण्याचा दावा फोल
ईव्हीएम मशीन हॅक करण्याचे प्रात्यक्षिक माध्यमांसमोर करण्याचे आयोजकांनी जाहीर केले. प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. आयोजकांकडे मशीनही नव्हती. यासंदर्भात विचारणा केली असता, ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती, त्यांच्या पक्षाची महत्त्वाची बैठक असल्याने ते येऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण फिरोज मिठीबोरवाला यांनी केले. आयोजक प्रशांत पवार यांनीही हेच कारण सांगितले.