ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 09:53 PM2019-10-25T21:53:47+5:302019-10-25T21:55:08+5:30
विधानसभा निवडणुकीचे कौल हाती येऊ लागले तसा सोशल मीडियावर एक मॅसेज तीव्र गतीने फिरू लागला. ‘ईव्हीएम आज शांत झोपली असेल...’, असा तो संदेश.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचे कौल हाती येऊ लागले तसा सोशल मीडियावर एक मॅसेज तीव्र गतीने फिरू लागला. ‘ईव्हीएम आज शांत झोपली असेल...’, असा तो संदेश. २१ ऑक्टोबरला मतदान आटोपले आणि लगेच चॅनलवाल्यांनी एक्झिट पोलमधून सत्तापक्षाला प्रचंड बहुमताचा कौल द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आधीच ईव्हीएमबाबत असलेला समज अधिक गडद झाला. सत्तापक्षानेही आत्मविश्वासात अतिमताधिक्याचा दावा केल्याने विरोधकांचा रोषही ईव्हीएमवर उमटू लागला. मात्र २४ ला लागलेल्या अनपेक्षित निकालाने एकीकडे एक्झिट पोलची हवा काढली तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनाही जमिनीवर आणले. विरोधी पक्ष पराभूत झाला असला तरी या निकालाने त्यांनाही दिलासा दिला आणि यात बचावली ती ईव्हीएम. मतमोजणीपूर्वीपर्यंत समज-गैरसमजातून प्रचंड रोष झेलणाऱ्या या ईव्हीएमने मोकळा श्वास घेतला असेल.
अलीकडच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमबाबत प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे किंबहूना करण्यात आला आहे. कारण जनादेश विरोधात गेला की आत्मचिंतन न करता त्याचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडून रोष व्यक्त करू लागतात. याला ही निवडणूकही अपवाद नव्हती. एकीकडे सत्तापक्षाने सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडविला असताना विरोधी पक्ष मात्र गर्भगळीत अवस्थेत असल्याचे दिसून आले. यात ईव्हीएमविषयी निर्माण झालेला संशय हेही एक महत्त्वाचे कारण ठरले. काही संघटनांनी तर ईव्हीएमविरोधात रान उठविले. मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे संदेश सोशल मीडियावर फिरू लागले. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलने ईव्हीएमविरोधातील आगीत तेल टाकण्याचेच काम केले. मात्र मतमोजणीनंतर आलेल्या निकालाने सारे अंदाज फोल ठरविले. सत्तापक्षाला सत्ता मिळाली पण हुरळून जावे असे यश त्यात नव्हते. दुसरीकडे विरोधी पक्षाला दिलासादायक निकालाने ऊर्जा मिळाली. निकालानंतर समज-गैरसमज किती दूर झाले, याबाबत शंका आहे, मात्र ईव्हीएमला दोष देण्याचा प्रकार दिसून आला नाही.
ईव्हीएमला दिलासा मिळाला पण यातून नवा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. विशेषत: निकालानंतर ठिकठिकाणी लोकांमध्ये रंगलेल्या चर्चांमुळे हा प्रश्न अधिकच तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अनेकांनी ‘ईव्हीएमवर असलेल्या संशयामुळे मतदानच केले नाही’, अशी व्यथा मांडली. मतदानाच्या दिवशी मतदान केले का, असा प्रश्न विचारला असता, ‘आपण केलेले मतदान मनातील उमेदवाराला जात नसेल तर मतदान करून उपयोग काय’, असा अनेकांचा सवाल होता.
असे कितीतरी नागरिक असतील ज्यांनी या संशयामुळे मतदानच केले नाही. खरतर निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्ष व संघटनांमुळे ईव्हीएमबाबत इतका संभ्रम निर्माण झाला की लोकांमध्ये संशयाने घर केले आहे. ग्रामीण भागात तर ईव्हीएमबाबत कमालीचा गैरसमज पसरला आहे. या संशयामुळे मतदान करायला गेलोच नाही, असे सांगणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे हा ईव्हीएमचा संशय कुणाच्या पथ्यावर पडला, हा आता चर्चेचा विषय आहे. यातही अनेकांद्वारे सत्तापक्षाने, ‘१० पावले पुढे टाकण्यासाठी दोन पावले मागे घेतले’, असाही संशय आता नव्याने व्यक्त केला जात आहे. सर्वांना शंका असतांना बॅलेट पेपरवरच निवडणुका का घेतल्या जात नाही, असा सवालही या चर्चेत आहे. चर्चांना रोखता येत नाही, पण निवडणुकीच्या निकालाने संशयाचे मळभ काहीसे दूर झाले असेल, असे म्हणायला हरकत ना