कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 08:49 PM2019-04-12T20:49:27+5:302019-04-12T21:18:08+5:30

रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन कळमना यार्ड येथील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे रात्रभर सुरु होती.

EVM Safe in Strong Room in the Kalamana | कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम सुरक्षित

कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम सुरक्षित

Next
ठळक मुद्देत्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था : वाहतुकीसाठी कंटेनरचा पहिल्यांदाच उपयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन कळमना यार्ड येथील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे रात्रभर सुरु होती. 


मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएममशीन या त्यांच्या-त्यांच्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय तेथून गेलेल्या ईव्हीएम, परत आलेल्या ईव्हीएम याची मोजणी झाली. सर्व व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक बुधनिहाय ईव्हीएम मशीन कंटेनरमध्ये व्यवस्थित लावून सील बंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालत होती. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जातीने हजर होते. त्यानंतर कंटेनर सीआरपीएफच्या सुरक्षेच्या घेऱ्यात कळमना यार्ड येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचवण्यात आले. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पहिले कंटेनर पोहोचले. त्यानंतर एकेक करून सर्व कंटेनर आले.
पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरचा वापर
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या कंटेनरमधून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व विधानसभा मिळून जवळपास २६ कंटेनरचा उपयोग करण्यात आला. यासर्व कंटेनरवर जीपीएस यंत्रणा होती. तसेच सीआरपीएफच्या सुरक्षा घेºयात ते कळमन्यात पोहोचवण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वत: होते हजर
कळमना येथे रामटेक व नागपूर या दोन्हीसाठी स्ट्राँग रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व कंटेनर आल्यावर त्यातील ईव्हीएम काढून ते स्ट्राँ्ग रुममध्ये बूधनिहाय लवून घेण्यात आले. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे स्वत: हजर होते. यासोबतच सर्व विधानसभांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या देखरेखीखाली सर्व ईव्हीएम व्यवस्थित ठेवून स्ट्राँग रुमची सुरक्षा सीआरपीएफच्या स्वाधीन केली.
अशी आहे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था
कळमना यार्ड येथे नागपूर व रामटेक लोकसभेसाठी दोन स्वतंत्र गोदामाचा वापर स्ट्राँग रुम म्हणून करण्यात आला आहे. हे दोन्ही गोदाम लागूनच आहेत. या गोदाममध्ये तीन मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी दोन दरवाजे पूर्णपणे सिमेंट विटा लावून बंद करण्यात आले. तर एकमेव गेटवर भले मोठा कुलूप लावून बंद करण्यात आले आहे. या दोन्ही गोदामाच्या चारही बाजूंनी कटेकोट बंदोबस्त आहे. दोन्ही स्ट्राँग रुम त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने वेढले आहे. सर्व प्रथम जे मुख्य गोदाम आहे, ते केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुरक्षा घेऱ्यात आहे. त्यानंतर चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दलाचा घेरा आहे. आणि कळमना परिसरात पोलिसांचा वेढा आहे. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. इतकेच नव्हे तर ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, तिथे आयोगाच्या निर्देशानुसार कुठल्याही प्रकारची लाईव्ह वायरिंग नाही. म्हणजे संपूर्ण गोदाम हे अंधारात राहीत. आतमध्ये कुठल्याही प्रकारचा लाईट सुद्धा लावण्यात आलेला नाही.
उमेदवार किंवा प्रतिनिधींना घेता येणार सुरक्षेचा आढावा
कळमना येथील ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. त्या परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी नाही. परंतु लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या सुरक्षित आहेत किंवा नाही, याचा आढावा घ्यायचा असेल तर त्यांना ते पाहता येऊ शकेल. परंतु त्याची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे एक लॉग बुक सुद्धा ठेवण्यात आलेले आहे.
कळमना येथे होणार मतमोजणी
सर्व टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकतील मतमोजणी कळमना यार्ड परिसरातच होणार आहे.

 

 

 

Web Title: EVM Safe in Strong Room in the Kalamana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.