ईव्हीएम संशयास्पद; बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात : राजू शेट्टी यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 08:49 PM2019-06-10T20:49:58+5:302019-06-10T20:51:11+5:30
लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
मतमोजणीच्या वेळी विशिष्ट फेऱ्यापर्यंत आघाडीवरील उमदेवार नंतरच्या फेºयात अचानक मागे गेले. एका विशिष्ट मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झालेत. देशभरात सरकारविरोधात रोष असूनही युतीचे उमेदवार निवडून आले. यापुढील निवडणुकीतही अशीच परिस्थिती कायम राहिली तर लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. देशात अराजकता माजेल, अशी भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफडे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष देवेंद्र भुयार, जिल्हा अध्यक्ष दयाल राऊ त, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बापुसाहेब करंडे आदी उपस्थित होते
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ‘एल्गार’ पुकारणार
राज्यात दुष्काळाने रुद्रावतार धारण केला आहे. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. गुरांचा चारा व पाणी मिळत नाही. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दुसरीकडे टँकर माफियांनी हैदोस घातला आहे. २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज होती. परंतु राज्य शासनाने बघ्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यक र्त्यांवर ३५३ कलमान्वये गुन्हे दाखल केले जात आहेत. शासनाच्या या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटना एल्गार पुकारणार आहे. यासाठीच विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
केंद्राच्या धोरणामुळे ऊ स उत्पादक संकटात
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी( फे अर रेम्युनरेटीव्ह प्राईस) अर्थात रास्त व किफायतशीर भाव न देणाऱ्या साखर कारखानदारावर शासनाने कारवाई करावी. यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून साखर आयुक्तांकडे वारंवार मागणी केली. वास्तविक एफआरपी न मिळण्याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. परंतु सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
विरोधकांनी एकत्र यावे
सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याने संघटनेची भूमिका सरकार विरोधात आहे. भाजप-शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकर घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.