लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:06 PM2019-01-03T23:06:07+5:302019-01-03T23:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची संपूर्ण तपासणी झाली असून या मशीन निवडणुकीसाठी सज्ज आहेत. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वत: पत्रपरिषदेत मशीन कशी काम करते याचे प्रात्यक्षिक दाखविले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले की, अत्याधुनिक, नवीन ईव्हीएम मशीन जिल्ह्याला मिळाल्या आहेत. ९,४३६ बॅलेट तर ५,४८६ कंट्रोल युनिट आहेत. आणि ५,४८६ व्हीव्हीपॅट मशीन मिळाल्या आहेत. या मशीन शासनाची कंपनी असलेल्या बी.ई.एल. आणि ई.सी.आय.एल. कंपनीकडून तयार करण्यात आल्या आहे. या ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी कळमना येथे झाली. तपासणीत ८९ बॅलेट युनिट, १२७ कंट्रोल युनिट तर ३७५ व्हीव्हीपॅट मशीन खराब निघाल्या. त्या बी.ई.एल. आणि ई.सी.आय.एल कंपनीला परत करण्यात आल्या. या व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनच्या तपासणीकरता सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. तपासणीच्या वेळी एकाही लोकप्रतिनिधीकडून विरोध दर्शविण्यात आला नाही किंवा आक्षेप घेण्यात आला नसल्याचे मुद्गल यांनी सांगितले. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मतदान झालेल्या व्यक्ती नाव, पक्षाचे चिन्ह आणि मतदान ओळख पत्रातील क्रमांक स्लीपमध्ये दिसेल. ही स्लीप सात सेकंद राहील. त्यानंतर स्लीप व्हीव्हीपॅट मशीनला असलेल्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा होईल. त्यानंतर मात्र मतदाराला ती पाहता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आक्षेप घेता येईल
मतदार करताना व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लीपमध्ये दुसºयाच उमेदवाराचे, चिन्ह दिसल्यास किंवा तसे वाटल्यास किंवा स्लीप न दिसल्यास मतदाराला संबंधित केंद्र प्रमुखाकडे फार्म १७ ए भरून आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर केंद्र प्रमुख टेस्ट मतदान घेईल. त्यात मतदाराने केलेले आक्षेप खरे आढळून आल्यास ते मशीन बाद केले जाईल.
प्रत्येक विधानसभेतील एक मतदान
केंद्रावरील व्हीव्हीपॅट स्लीपची तपासणी
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील मत, मतदार यादीतील नोंद आणि व्हीव्हीपॅट स्लीपची तपासणी होणार आहे. यात तफावत आढळ्यास संबंधित ठिकाणी नव्याने मतदान होईल.
कोट...
इव्हीम मशीन कॅल्कुलेटरप्रमाणे आहे. त्याचा कोणत्याही इतर वस्तूशी संबंध येत नाही. त्यामुळे त्याला हॅक करणे किंवा दुरुन हाताळणे शक्य नाही. नवीन मशीन अतिशय सुरक्षित आहे.
अश्विन मुदगल
जिल्हाधिकारी
जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत निवडणूक विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी एक चित्ररथ तयार करण्यात आला असून हा रथ संपूण जिल्ह्यात फिरणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.
जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार क्षेत्रात हा रथ जाणार आहे. ४१ दिवस या रथाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यात येत आहे. तसेच व्हीव्हीपॅटबाबतही माहिती देण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी माहिती फलके लावण्यात आली आहे. निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन व त्यावर केलेले मतदान अधिक विश्वासार्ह होण्यासाठी या मशीनसोबतच व्हीव्हीपॅट मशीन प्रत्यक्षात कसे काम करते, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४३८२ मतदान केंद्र आहे. या सर्व मतदान केंद्रावरही याच्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. प्रात्यक्षिके करण्यात येतील.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उप जिल्हाधिकारी व्ही.बी. जोशी, ज्ञानेश भट, जगदीश कातकर, नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.