ईव्हीएममध्ये गोलमाल
By admin | Published: February 26, 2017 02:08 AM2017-02-26T02:08:22+5:302017-02-26T02:08:22+5:30
महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला. ईव्हीएममध्ये सेटिंग करून एका उमेदवाराची मते दुसऱ्या उमेदवाराकडे वळविण्यात आली.
सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांचा आरोप : मतपत्रिकेद्वारे फेरमतदानाची मागणी
नागपूर : महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला. ईव्हीएममध्ये सेटिंग करून एका उमेदवाराची मते दुसऱ्या उमेदवाराकडे वळविण्यात आली. यासंदर्भात उमेदवारांनी तक्रारी केल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागपुरात धक्कादायक व अनपेक्षित निकाल लागले, असा आरोप काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लीम लीग व बसपाच्या पराभूत उमेदवारांनी केला आहे. ईव्हीएमच्या घोळाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर नागपूरकरांनी भाजपाने केलेल्या विकास कामांना पावती दिली असून ईव्हीएमच्या घोळाचे आरोप करण्यापेक्षा कायदेशीर मार्ग वापरा, असा सल्ला भाजपा नेत्यांनी दिला आहे.
पराभूत उमेदवार व त्यांच्या समर्थकांची शनिवारी सीए रोडवरील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. रमण ठवकर, कांता पराते, शिवसेनेचे बंडू तळवेकर, कि शोर पराते, बसपाच्या किरण पाटणकर तसेच भाजपाने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीकडून लढलेल्या मीना तिडके, काँग्रेसने उमदेवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले अरुण डवरे यांच्यासह इतर पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उमेदवारांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रभागातील मतदारांचा प्रचंड पाठिंबा होता. यापूर्वीही आम्ही निवडणुका लढविल्या असल्याने प्रभागातील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे, याचा उमेदवारांना अंदाज येतो. थोड्याफार फरकाने तो चुकीचा ठरू शकतो. परंतु या निवडणुकीत ईव्हीएमच्या घोळामुळे अनपेक्षित व एकतर्फी निकाल लागले. जेथे शंभर-दोनशे मतात निकाल लागेल, असे वाटत होते तेथे तीन ते चार हजार मतांनी पराभव झाला. ही बाब पटणारी नाही. निकालांवर मतदारांचाही विश्वास बसेनासा झाला आहे. ईव्हीएमच्या घोळामुळे असे एकतर्फी निकाल आले असून निष्पक्ष वातावरणात मतपत्रिकेच्या माध्यमातून फेरनिवडणूक घेण्यात यावी,अशी अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
मंगळवारी घेणार आंदोलनाचा निर्णय
बैठकीत उपस्थित असलेले काँग्रेसचे पराभूत नगरसेवक सुरेश जग्यासी यांनी सांगितले की, सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र प्राप्त केल्यानतंर मंगळवारी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. पराभूत उमेदवार व नागरिकांना एकत्र करून या विरोधात लोकलढा उभारला जाईल. तसेच ईव्हीएमचच्या एकूणच प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.