देशात शंभरहून जास्त घरफोड्या करणारा माजी सैनिक ताब्यात; प्रेयसी व सहकाऱ्यासह नागपुरात येऊन फोडले घर

By योगेश पांडे | Published: June 17, 2024 09:15 PM2024-06-17T21:15:58+5:302024-06-17T21:16:17+5:30

गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी व सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे अधिकारी या गुन्ह्याचा तपास करत होते.

Ex-soldier arrested for burglarizing more than 100 houses in the country; Came to Nagpur with girlfriend and colleague and broke the house | देशात शंभरहून जास्त घरफोड्या करणारा माजी सैनिक ताब्यात; प्रेयसी व सहकाऱ्यासह नागपुरात येऊन फोडले घर

देशात शंभरहून जास्त घरफोड्या करणारा माजी सैनिक ताब्यात; प्रेयसी व सहकाऱ्यासह नागपुरात येऊन फोडले घर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात शंभरहून अधिक घरफोड्या करणाऱ्या माजी सैनिकासोबतच दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींना अजमेर पोलिसांनी अटक केली होती व नागपुरातील घरफोडीच्या प्रकरणात गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रोडक्शन वॉरंटवर दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी मोठ्या घरफोडीच्या घटनांचा उलगडा होऊ शकतो.

८ मे रोजी सकाळच्या सुमारास दीपक रंजीत सरकार (प्रेरणा नगर) यांच्याकडे अज्ञात चोरट्याने ७ लाखांची घरफोडी केली होती. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी व सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे अधिकारी या गुन्ह्याचा तपास करत होते. खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार यात आंतरराज्यीय टोळी असल्याची बाब समोर आली. गुन्हे शाखेच्या एका पथकाने राजस्थानमध्ये जाऊन मीनू देविसेन (हरमाळा, जयपूर) हिला ताब्यात घेतले. तिने सतपाल उर्फ फौजी ओमपाल सिंह (४४, सेक्टर ७, मानेसर, गुरुग्राम, हरयाणा) व विकास पवन शर्मा (३५, झुणझुण, राजस्थान) यांनी नागपुरातील या घरफोडीसह सहा गुन्हे केल्याची माहिती दिली. सतपाल हा आठ वर्ष भारतीय सैन्यात होता. त्याने ती नोकरी सोडल्यावर देशभरात शंभरहून अधिक घरफोड्या केल्या. त्याच्यावर तेवढे गुन्हेदेखील दाखल आहेत.

दोन्ही आरोपींना अजमेर पोलिसांना एका गुन्ह्यात अटक केल्याची बाब समोर आली. त्यांनी गिट्टीखदानसह, सोनेगाव, लातूर, संभाजीनगर, अहमदनगर, कर्नाटक, कोलकाता येथेदेखील घरफोडी केल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले व गिट्टीखदान पोलीस ठाण्याला माहिती दिली. आरोपींच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. सहायक पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया, राजेश देशमुख, रवी अहीर, प्रशांत गभणे, श्रीकांत उईके, प्रवीण रोडे, निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार, आशीष वानखेडे, विवेक झिंगरे, पराग ढोक, शेखर राघोर्ते, अनंता क्षीरसागर, धीरज पंचभावे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Web Title: Ex-soldier arrested for burglarizing more than 100 houses in the country; Came to Nagpur with girlfriend and colleague and broke the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.