जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार हवामानाचा अचूक अंदाज
By admin | Published: June 9, 2017 05:45 PM2017-06-09T17:45:09+5:302017-06-09T17:45:09+5:30
पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
मिलिंद कीर्ती
चंद्रपूर : पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना येत्या जुलै महिन्यापासून हवामानाच्या अचूक वेळेचा अंदाज मोफत मिळणार आहे. राज्यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. या केंद्रांचा लाभ राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
विदर्भामध्ये कोरडवाहू शेती आहे. ती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. तसेच पश्मिच महाराष्ट्रातील काही जिल्हे कायमचे दुष्काळी असतात. या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज कसा राहील, याची माहिती अत्यंत आवश्यक आहे. पावसात खंड पडला की, दुबार, तिबार पेरणी करावी लागते. तसेच अवकाळी पावसामुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. हे केवळ हवामानाच्या अचूक माहितीअभावी घडत असते. त्याकरिता राज्याच्या कृषी खात्याने ‘महावेध हवामानाचा, समृद्ध शेतीचा’ असे अभियान हाती घेतले आहे.
शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्याकरिता प्रत्येक महसूल मंडळामध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहे. त्याकरिता महसूल खात्याने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हे काम जूनअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुणे येथे स्कॉयमेट व्हेदर ही संस्था प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती संकलित करणार आहे. त्यानंतर ती जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. ती माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालय व तालुका कृषी कार्यालयातही हवामानाचा अंदाज उपलब्ध राहणार आहे.
प्रत्येक १० मिनिटांनी अंदाज
सध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्या सेवेशी राज्यातील ५० लाख शेतकरी जोडण्यात आलेले आहेत. या ५० लाख शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १० मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे.
सौर उर्जेवर चालणार केंद्र
स्वयंचलित हवामान केंद्र बंद पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. हे केंद्र सौर उर्जेवर आधारित आहे. त्यामुळे केंद्राची देखभाल करण्यासाठी फारसा वेळ द्यावा लागणार नाही. केंद्राद्वारे शेतकऱ्यांना तापमान, पर्जन्यमान, सापेक्षा आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा आदी माहिती एसएमएसने देण्यात येईल.